
कांदळवनाची तोडीवर आळा बसणार
महाड, ता. ५ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यामधील बेकायदा होणारी कांदळवनांची कत्तल आणि गौण खनिज उत्खनन याला आता आळा बसणार आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांना नियंत्रण कक्षामध्ये अथवा थेट व्हॉट्सअप क्रमांकाचा वापर करून आपली तक्रार दाखल करता येणार आहेत. कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास थांबवावा; तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक थांबावे, यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले.
उच्च न्यायालयाने कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडील ३ नोव्हेंबर २०१८ च्या पत्राच्या अनुषंगाने आणि १६ नोव्हेंबर २०१८ च्या आदेशान्वये जिल्हा व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी आणि अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक १०७७ आणि व्हॉटसअप ८२७५१५२३६३ चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल होत आहे. तर माती उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर, तर वाळू उपसासाठी नद्यांचे किनारे पोखरले जात आहेत. याबाबत आता नागरिकांना थेट दाद मागणे यामुळे शक्य होणार आहे.