
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
महाड, ता. ५ (बातमीदार) : मूल होत नसल्याने पत्नीचा छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरोधात महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाड तालुक्यातील ईसाने कांबळे येथील रुकसार फरहान येलुकर (वय २७) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी घडली होती. पोलादपूर तालुक्यातील वावे या गावातील रुकसार हिचा विवाह डिसेंबर २०२१ मध्ये ईसाने कांबळे येथील फरहान मुस्ताक येलुकर याच्यासोबत झाला होता. लग्नाला तीन वर्षे होऊनही तिला मूल होत नसल्याने वारंवार हिणवून तिचा छळ केला जात असे. अखेर तिने छळाला कंटाळून बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महिलेचे वडील अब्दुल करबेलकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी रुकसार हिचा सासरा मुस्ताक येलुकर, सासू फैरोजा येलुकर व पती फरहान येलुकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.