‘शिवम’चे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

‘शिवम’चे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

महाड, ता. १२ (बातमीदार) : इमारतीशेजारील विहीर कोसळल्याने धोकादायक झालेल्या शिवम अपार्टमेंट या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पथक दाखल होणार आहे. त्यानंतरच पालिका प्रशासनाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही विहीर बुजविण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी विकसक अंकित धारिया यांच्याकडे केली होती. याला धारिया यांनी अनुकूलता दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी धारिया यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. ‘सकाळ’मध्ये यासंबंधीचे वृत्त रविवारी प्रकाशित करण्यात आले होते.

महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात असलेली धारिया कॉम्प्लेक्समधील शिवम अपार्टमेंट या इमारतीजवळ असणारी विहीर कोसळल्याने या विहिरीलाच लागून असणारे इमारतीचे कॉलम उघडे पडले आहेत. या इमारतीला धोका असल्याचे लक्षात आल्याने येथील रहिवाशांनी तसेच पालिका प्रशासनानेदेखील ही इमारत खाली केली आहे. या इमारतीमध्ये १८ सदनिका असून सुमारे बहात्तर रहिवासी वास्तव्य करतात. सन २०१७ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. शनिवारी सायंकाळी ही इमारत धोकादायक झाल्याचे कळताच पालिका प्रशासनाचे अधिकारी व स्ट्रक्चरल इंजिनियर घटनास्थळी दाखल झाले होते; परंतु सायंकाळच्या अंधारात इमारतीची व्यवस्थित पाहणी करता आली नाही. त्यामुळे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सचिन पोरे व त्यांच्या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर ही इमारत राहण्यास योग्य आहे अथवा नाही, याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
.........
स्ट्रक्चरल इंजिनिअर पथकाकडून या इमारतीची सखोल पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर येणाऱ्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल.
- जितेंद्र शेळके (नगर अभियंता महाड नगरपरिषद)
.......
याबाबत बिल्डरशी चर्चा करण्यात आलेली आहे. विहीर बुजवून इमारतीचा भाग पूर्ववत करण्याचे आश्वासन बिल्डरने दिलेले आहे; परंतु तरीही पूर्ण निर्णय झाल्याखेरीज रहिवासी पूर्णपणे स्थलांतरित होण्यास तयार नाहीत.
- अशोक जाधव, अध्यक्ष, शिवम अपार्टमेंट सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com