
चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिनी प्रथमच सशस्त्र मानवंदना
महाड, ता. १९ (बातमीदार) ः चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन सोमवारी (ता. २०) शहरात उत्साहात साजरा होत असून यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर लोटण्याची शक्यता आहे. सत्याग्रहाच्या वर्धापनदिननिमित्त यंदा प्रथमच सरकारकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली जाणार आहे. येणाऱ्या भीमसैनिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडूनही चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
अस्पृश्यतेचे जोखड तोडून टाकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ ला चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता. इतिहासामध्ये सत्याग्रहाची विशेष महत्त्व असून दरवर्षी महाडमध्ये वर्धापन दिन साजरा केला जातो. याकरिता राज्य व देशभरातून भीमसैनिक येतात.
डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींची गैरसोय होऊ नये, याकरिता महाड नगरपालिकेकडून चवदार तळे ते क्रांती स्तंभ परिसरात २५ नळ जोडण्या, पाण्याच्या मोठ्या साठवण टाक्या, पन्नास फिरती स्वच्छतागृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, माता रमाई विहारात निवासाची सुविधा, चवदार तळ्याची रंगरंगोटी केली आहे. या वर्षी प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र शासकीय मानवंदना दिली जाणार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी अनेक संस्था व संघटना सहभागी होतात. क्रांतीस्तंभ येथे एकाच व्यासपीठावर सर्व गटांना ठराविक वेळेनुसार सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी शिवराय ते भीमराव असा रायगडच ते चवदार तळे असा समता मार्च काढण्यात आला होता. सकाळी सात वाजता किल्ले रायगड येथून रॅलीला सुरुवात झाली व चवदार तळे येथे सांगता करण्यात आली. या सत्याग्रहाच्या निमित्ताने चवदार तळे, क्रांतीस्तंभ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
पार्किंगची सुविधा
- महाड शहर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पार्किंग व्यवस्थाही केली आहे.
- मुंबईहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग गांधारी नाका येथे, रायगड नाते गावाकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग एसटी स्टँडजवळ केली आहे.
- दापोली-रत्नागिरीकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग चांदे क्रीडांगण येथे केली आहे.
- पोलादपूर, पुणे बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी माणिकराव जगताप मैदान, नवेनगर येथे केली आहे.
- अतिरिक्त पार्किंग म्हणून नगरपालिका शाळा क्रमांक पाचचे मैदान व गाडीतळ या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
- अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे कार्यक्रमास आगमन झाल्यास हेलिपॅडसाठी राखीव जागा करण्यात आली आहे.
फोटो