
संमेलनात दर्जेदार कवितांनी सादरीकरण
महाड, ता. २० (बातमीदार) : सत्याग्रह दिनानिमित्त चवदारतळे साहित्यमंच क्रांतीभूमी आणि सम्यक शिक्षक सामाजिक विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी चवदार तळ्याच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चवदारतळे या विषयावर जिल्हास्तरीय खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. डॉ आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या दर्जेदार कविता यावेळी सादर करण्यात आल्या.
जिल्ह्यातून ३० कवींनी संमलनात उपस्थिती लावली. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी कम्युनिस्ट विचारसरणीचे नेते विचारवंत सुबोध मोरे, चवदारतळे साहित्य मंचाचे संस्थापक कवी शाहीर गंगाधर साळवी, सम्यक शिक्षक सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष नितीन जाधव, डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष विनायक हाटे, कवी मन समूहाचे संस्थापक सुधीर नागले, दीपक पाटील, दीपक साळवी, वैभव कांबळे, बौद्धजन पंचायत समिती महाड तालुक्याचे अध्यक्ष अशोक जाधव, रवींद्र चव्हाण इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविकात गंगाधर साळवी यांनी साहित्य मंचाची पार्श्वभूमी व कवी संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. सुबोध मोरे यांनी महामानवांच्या कार्याच्या प्रचाराचे कार्य दोन्ही संस्थांकडून होत असल्याचे समाधान व्यक्त केले. विनायक हाटे, नितीन जाधव, दीपक पाटील यांनी आपले विचार मांडले.
कवी संमेलनाची सुरुवात शिवराय ते भीमराय समता मार्चच्या जनजागृतीसाठी मुंबईहून आलेल्या कलापथकाने ‘बाई मी धरण धरण बांधते ग’ या गीताने झाली. संमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री गीतांजली साळवी आणि रीना पाटेकर यांनी केले. गोरेगावहून आलेले कवी मन समूहाचे संस्थापक आणि कोमसाप गोरेगावचे उपाध्यक्ष सुधीर नागले, नागोठणे येथून आलेले रायगड भूषण पुरस्कार प्राप्त कवी अशोक भंडारे, कोळोसे येथील कवी आनंद जाधव यांच्या कविता रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या. डॉ प्रभाकर गावंड आणि गीतांजली साळवी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर स्वरचित पोवाडे सादर केले. याशिवाय अनेकांनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सम्यक शिक्षक सामाजिक मंचचे रवींद्र पाटील यांनी मानले.