
महाडमध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाड, ता. १९ (बातमीदार) : शेतात बकऱ्या चरण्यासाठी गेल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील चोचिंदे या गावात शनिवारी (ता. १८) सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. बारामती येथील जंदाबाई दगडे यांचा बकरी पालनाचा व्यवसाय असून त्या बकऱ्या घेऊन चोचिंदे या गावी आल्या होत्या. तेथे त्यांनी तंबू ठोकून शेजारच्याच शेतामध्ये बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या. या गोष्टीचा राग आल्याने जंदाबाई दगडे व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांना भागोजी बरकटे, सागर बरकटे, दत्ता बरकटे व अमोल दगडे यांनी मारहाण केल्याची व झटापटीमध्ये गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हरवल्याची तक्रार जंदाबाई यांनी दाखल केली आहे. दुसरीकडे भागोजी बरकटे यांनीदेखील मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी लक्ष्मण पडळकर, बाळू पडळकर, जंदाबाई दगडे व जयश्री ठोंबरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.