
रायगड रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
महाड-रायगड रस्त्याचे काम कूर्मगतीने
पावसामुळे चिखलाचे साम्राज्य
महाड, ता. २२ (बातमीदार) : महाड ते रायगड या सुमारे पंचवीस किलोमीटर रस्त्याचे आता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. नव्या महामार्गाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. परंतु मधल्या काळात पहिल्या ठेकेदाराने काम सोडून दिल्याने नवीन एजन्सी नियुक्त करण्यात आली. तसेच कोरोना काळापासून काम संथगतीने सुरू आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने रुंदीकरणासाठी खोदलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहने चालवणे जिकिरीचे झाले होते. या रस्त्यासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले जाणार असून यामुळे रायगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. परंतु अनेक दिवस रस्त्याचे काम कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मावळा संघटना रायगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग महाड विभागाच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांची भेट घेत जाब विचारला.
३१ मे पर्यंत काँक्रिटीकरण करणार
महाड विभागातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांनी ३१ मे पर्यंत कोंझरपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले. तोपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मावळा संघटनेचे अध्यक्ष योगेश भागवत यांनी दिला आहे.
महाड ः कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांच्याशी योगेश भागवत व संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
.................................