
रेशनिंग गैरव्यवहारप्रकरणी पाचाड ग्रामस्थांचे उपोषण सुरू
महाड, ता. २३ (बातमीदार) : रेशनिंग दुकानांमधील गैरव्यवहाराबाबत पाचाड ग्रामस्थांनी मध्यंतरी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने सुनावणीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित केले गेले. परंतु सातत्याने तीन तारखा देऊन देखील सुनावणी होत नसल्याने पाचाड ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत पुन्हा सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते शाश्वत धेंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
ऐतिहासिक पाचाड गावामध्ये असलेले रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकाने तात्पुरत्या स्वरूपात अन्य व्यक्तीस चालवण्यास दिले होते. मात्र सदर व्यक्तीने ग्राहकांशी अर्वाच्य भाषेत बोलणं, धान्य वाटपात गैव्यवहार, ग्राहकांना पावती न देणे असे प्रकार सुरू केले होते. धान्य देताना ऑनलाइन वर वेगळीच नोंद करून ग्राहकांची फसवणूक केली आहे. प्रत्यक्ष दिलेले धान्य आणि ऑनलाईन नोंदणीत मोठी तफावत आहे. याबाबतचे सबळ पुरावे पाचाडमधील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते शाश्वत धेंडे यांनी प्रशासनासमोर सादर केले. तरी देखील कारवाई न झाल्याने फेब्रुवारीत बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी स्थानिक प्रशासनाने मध्यस्थी करत कारवाईचे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे ९ मार्चला सुनावणी घेऊन कारवाई केली जाईल, असे लेखी कळवले होते. मात्र यानंतर तीनवेळा सुनावणी रद्द करण्यात आल्याने रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांची शासन पाठराखण करत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी २० मार्च पासून पाचाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आपले आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणकर्ते ग्रामस्थ शाश्वत धेंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी माजी सरपंच देविदास गायकवाड, गोपाळ गायकवाड, भगवान गायकवाड, प्रशांत गायकवाड, अनिरुद्ध गायकवाड, अनिल गायकवाड, उमेश गायकवाड, बयाजी गायकवाड, सुरेश गायकवाड, दिलीप गायकवाड आदी ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने संबंधित दुकानाचा परवाना रद्द करावा शिवाय ग्रामस्थांचे धान्य हडप केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा तेव्हाच उपोषण मागे घेतले जाईल
- शाश्वत धेंडे, उपोषणकर्ते
महाड ः उपचारासाठी दाखल झालेले शाश्वत धेंडे