
आईची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
महाड, ता. २८ (बातमीदार) : पुण्याला जाण्यासाठी पैसे दिले नाही, याचा राग मनात धरून आईचा खून करणाऱ्या मुलाला माणगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महाड तालुक्यातील नागाव येथे १३ मार्च २०२० मध्ये ही घटना घडली होती.
शिक्षा ठोठावलेल्या मुलाचे नाव मधुकर चंद्रकांत सकपाळ असून त्याने आई शकुंतला (७०) तिची निर्दयपणे हत्या केली होती. मधुकरला पुण्याला जाण्यासाठी पैसे हवे होते, मात्र शकुंतला यांनी ते न दिल्याने राग मनात धरून त्याने आईला शिवीगाळ करून सतत तीन दिवस हाताबुक्याने जबर मारहाण केली. नंतर तिचे डोके भिंतीवर आपटून कपाळावर लोखंडी कोयत्याने वार करून ठार मारले. त्यांच्या नागाव येथील घरात ही घडना घडली. याप्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती व मधुकर सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास महाड तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक नितीन गवारे यांनी केला. दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय, माणगाव येथे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपीचे वडील चंद्रकांत सकपाळ व चंद्रकांत आरेकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. मधुकरला दोषी ठरवून जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.