महाडमध्ये पाणीटंचाई आराखडा तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये पाणीटंचाई आराखडा तयार
महाडमध्ये पाणीटंचाई आराखडा तयार

महाडमध्ये पाणीटंचाई आराखडा तयार

sakal_logo
By

महाड, ता.२८ (बातमीदार) : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाड पंचायत समितीकडून या वर्षी तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये ३३ गावे व १२२ वाड्या अशा एकूण १५५ ठिकाणांचा समावेश आहे. टँकरने पाणीपुरवठा तसेच नवीन विंधन विहिरी खोदाई यासाठी ४१ लाख ५० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
महाड तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने उन्हाळ्यात नदी-नाल्यांचे स्‍त्रोत आटतात व पाणीटंचाईच्या झळा बसतात. दुर्गम गावातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा एकमेव मार्ग प्रशासनाकडे असतो. मागील वर्षी तालुक्यात १७ गावे व ७९ वाड्यांना प्रत्यक्षात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. या वर्षी थंडी लांबल्याने पाणीटंचाई कमी जाणवण्याची शक्‍यता आहे.
महाड तालुक्यातील पिंपळकोंड, शेवते, वाकी बुद्रुक गावठाण , आढी, घुरुपकोंड, ताम्हाणे, सापे, टोळ बुद्रुक, साकडी, नातोंडी मुळगाव ,पाचाड पुनाडे, वारंगी इत्यादी तेहतीस गावांबरोबरच अनेक वाड्या देखील पाणीटंचाईला सामोरे जाणार आहेत. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नडगाव तर्फे तुडील , धामणे ,किये ,पिंपळवाडी ,कोथुर्डे ,दहिवड नेराव,दासगाव सांदोशी अशा सुमारे १९ ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
महाड तालुक्यामध्ये सावित्री, गांधारी, काळ व नागेश्वरी या चार प्रमुख नद्या असूनही तालुक्यातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असते. जल जीवन योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये शंभरहून अधिक नळ पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली असून यानंतर पाणीटंचाई कमी होईल अशी आशा ग्रामस्थांना आहे.

टँकरने पाणीपुरवठा - १५५ गावे - खर्च - ३२ लाख
विंधन विहिरी - १९ वाड्‌या - खर्च ९ लाख ५०
एकूण आराखडा - ४१ लाख ५०