वरंध घाटातील प्रवास सुखकर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरंध घाटातील प्रवास सुखकर!
वरंध घाटातील प्रवास सुखकर!

वरंध घाटातील प्रवास सुखकर!

sakal_logo
By

महाड, ता. २९ (बातमीदार) : वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती व अरुंद घाटामुळे पुणे व पंढरपूरला जाण्यासाठी उपयुक्त असलेला वरंध घाट मार्ग धोकादायक झाला आहे. लवकरच हा मार्ग नव्याने राष्ट्रीय महामार्ग होत आहे. त्‍यामुळे स्‍थानिकांसह प्रवाशांकडून समाधान व्यक्‍त होत आहे. राजेवाडी ते वरंध घाट, पुणे जिल्हा हद्द या रस्त्याच्या कामासाठी १२६ कोटीचा अपेक्षित खर्च येणार आहे. तालुक्यातील राजेवाडी ते वरंध घाटमार्गे पुणे जिल्हा हद्दीतील नव्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ३०) होत आहे.
कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , तसेच राष्ट्रीय महामार्ग राजेवाडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द या प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पनवेलमधील खारपाडा टोल प्लाझाजवळ गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
महाड-वरंध घाट भोरमार्गे पुणे हा सुमारे १२० किलोमीटरचा रस्ता असून पुणे येथे जाण्यासाठी हा सर्वात जुना मार्ग आहे. हाच रस्ता पंढरपूर येथे जात असल्याने महाड- पंढरपूर हा राज्यमार्ग म्हणून ओळखला जात होता. परंतु काही वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्याहून महाडकडे येण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने नेहमीच वर्दळ असते. काही वर्षांपासून अतिवृष्टीमुळे हा मार्ग आणि वरंधघाट धोकादायक बनल्‍याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले होते. वरंध भागातील तसेच वाघजाई येथील स्‍थानिकांचे व्यवसायही संकटात सापडले होते. यामुळे एसटीच्या काही फेऱ्या ताम्हिणी घाटमार्गे सुरू करण्यात आल्‍या. आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण तसेच डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे घाटातील प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे. या रस्त्यामुळे पर्यटन व औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

घाटमाथ्‍यावर सुरक्षा भिंत
महाड तालुक्‍यातील राजेवाडी ते वरंध घाटातील रस्‍ता सुमारे २२ किलोमीटर लांबीचा असून यासाठी १२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. राजेवाडी ते वरंध गावापर्यंत रस्ता काँक्रीटचा केला जाणार आहे तर वरंधपासून घाटातील रस्‍त्‍याचे डांबरीकरण केला जाणार आहे.
राजेवाडी ते वरंध या मार्गावर माझेरी वाघजाई मंदिरापर्यंत घाटमाथ्‍यावर संरक्षक भिंत, गॅबियन वॉलसह एकूण २२ किलोमीटरच्या मार्गावर सहा छोटे पूल व सुमारे ९० पाइप मोऱ्या टाकण्यात येणार आहेत.

गेले काही वर्षे वरंध घाटातील वाहतूक विस्कळित होत आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर वाहतुकीवर परिणाम होतो. हा मार्ग जुना व जवळचा असल्याने महामार्ग झाल्‍यास प्रवाशांना नक्कीच उपयोग होईल.
- महादेव बारजे, वाहन चालक