वेदांत कंपनीला काळीज ग्रामस्थांचा विरोध

वेदांत कंपनीला काळीज ग्रामस्थांचा विरोध

महाड, ता. २९ (बातमीदार) : औद्योगिक क्षेत्रामधील काळीज गावालगत वेदांत डायस्टफ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. या ठिकाणी कंपनी सुरू करण्यास काळीज ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. कारखान्यामुळे भविष्‍यात परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या कारणास्तव ग्रामस्थांनी बुधवारी महाड तहसील कार्यालयाला याबाबत निवेदन सादर केले.
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक औषध निर्माण कारखाने असून आता त्यात वेदांत डायस्टफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भर पडणार आहे. काळीज गावामध्ये प्लॉट नं. के ११-१२ या ठिकाणी ही कंपनी सुरू करण्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंपनीला जागा दिली आहे. या ठिकाणी कोणतीही कंपनी सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्‍याठिकाणी कंपनी उभारली जाणार आहे, त्या जागेलगत काळीज गावाची वस्ती आहे. तसेच या जमिनीवर मोकळा प्लॉट म्हणून आरक्षण दाखवण्यात आले होते. बाजूलाच क्रीडांगणही आहे. कंपनीमध्ये डाईज पिगमेंट बनवले जाणार असल्यामुळे तसेच उत्पादनही पावडर स्वरूपात असल्याने ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्या स्वरूपात कंपनी उभारली जाऊ नये, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत काळीज ठरवली ग्रुप कंपनीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर तसेच महिलावर्गाने तीव्र निषेध व्यक्त केला असून तहसीलदारांना याबाबत पत्र दिले आहे. नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

कंपनीसाठी दिलेल्‍या जागेवर आरक्षण असतानाही ते बदलून जागा देण्यात आली. या ठिकाणी कंपनी होणे ग्रामस्थांच्या हिताचे नाही.
- चैतन्य म्हामुणकर, सरपंच, काळीज-खरवली ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com