
बैलगाडी स्पर्धा समितीची शेतकऱ्याला मदत
महाड (बातमीदार) : गोठ्याला आग लागून चार बैलांचा मृत्यू झाल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महाड-पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच समितीच्या प्रयत्नाने पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मार्च महिन्यात महाड तालुक्यातील वहूर गावचे शेतकरी रफिक झटाम यांच्या गोठ्याला आग लागून चार खिल्लार जातीच्या बैलांचा मृत्यू झाला होता. हे बैल बैलगाडा शर्यतीचे होते. शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हात देण्याचे आवाहन महाड-पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच समितीने केले होते. नुकत्याच मोहोप्रे ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यत स्पर्धेदरम्यान झटाम यांना पंचवीस हजार शंभर रुपयांचा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला. मदतनिधी मिळवून देण्यासाठी बैलगाडी मालक स्वरूप (मुन्ना) खांबे, सचिव अनिल कोदेरे, बैलगाडी मालक नीलेश चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.