महाड एमआयडीसीतील ४०० झाडांची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाड एमआयडीसीतील ४०० झाडांची कत्तल
महाड एमआयडीसीतील ४०० झाडांची कत्तल

महाड एमआयडीसीतील ४०० झाडांची कत्तल

sakal_logo
By

रस्ता रुंदीकरणासाठी एमआयडीसी मध्ये ४०० झाडांची कत्तल, पर्यावरणाचा प्रश्न
महाड, ता. १ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हजारो झाडे तोडण्यात आली असल्‍याने सावली हरवली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वाहनचालकांसह प्रवाशांना महामार्गावर झाडे नसल्‍याने उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागताहेत. आता महाड औद्योगिक क्षेत्रातील चार किलोमीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणासाठी जवळपास ४०० झाडांची तोडली जात आहेत. आधीच प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या एमआयडीसीचे पर्यावरण संतुलन यामुळे बिघडण्याची शक्‍यता आहे.
महाड तालुक्यामध्ये सध्या रस्ते व इतर प्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. शिवाय रायगड, वरंध तसेच खाडीपट्टा भागातील रस्त्यांचेही राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने येथे मार्गांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. महाड तालुक्यात महामार्गाच्या रुंदीकरणात १४ हजार झाडांची कत्तल झाली असताना त्यात आता एमआयडीसीमधील झाडांचीही भर पडणार आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याचे दोन्ही बाजूला दोन मीटर याप्रमाणे चार मीटर रुंदीकरण केले जात आहे. या चार किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन्ही बाजूने रुंदीकरण होत असताना सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे जुने वृक्षही तोडले जात आहेत. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने चारशे वृक्षांची तोड केली जात आहे आणि या करिता वन विभागानेही परवानगी दिली आहे.

आपत्ती वाढण्याची भीती
महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुळातच महाड तालुका आपद्ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे या ठिकाणी पूर येणे, दरड कोसळणे अशा अनेक आपत्ती घडत असतात, त्यातच आता आणखीनच वृक्षतोड होत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडण्याची शक्‍यता आहे.


रस्ता रुंदीकरणासाठी ४०० झाडे तोडण्यात येणार असली तरी नियमाप्रमाणे त्या बदल्यात २ हजार झाडे नव्याने लावली जाणार आहेत. याकरिता एमआयडीसीत जागा देखील उपलब्ध केली आहे किंवा रस्त्याच्या बाजूलाही झाडे लावली जाणार आहे.
- संतोष करंडे, कार्यकारी अभियंता, महाड एमआयडीसी