राजेवाडी-चिंभावे फाटा रस्‍ता दुरुस्‍ती सुरू

राजेवाडी-चिंभावे फाटा रस्‍ता दुरुस्‍ती सुरू

महाड, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील राजेवाडी फाटा ते चिंभावे फाटादरम्‍यान रस्त्याची दुरवस्‍था झाली होती. त्‍यामुळे परिसरातील २० हून अधिक गावांतील नागरिकांसह वाहनचालकांना प्रवास नकोसा झाला होता. रस्‍त्‍याच्या दुरुस्‍तीसाठी कोकण श्रमिक संघ मिनीडोअर चालक-मालक संघटनेच्या नेतृत्‍वाखाली नुकतेच रावढळ येथे रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले. त्‍यामुळे खडबडून जागे झालेल्‍या महामार्ग विभागाने आंदोलनाची दखल घेत, दुरुस्तीचे लेखी आश्वासन देत तातडीने खड्डे भरण्याचे काम सुरू केल्यामुळे ग्रामस्‍थांनी समाधान व्यक्‍त केले आहे. या आंदोलनात परिसरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
रायगड जिल्ह्यातील महाड राजेवाडी फाटा ते रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे गावांना जोडणाऱ्या नवीन महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. हा रस्ता महाड तालुक्यातील खाडीपट्टा भागातून जातो. येथून खासगी वाहतूक रिक्षा तसेच विक्रम रिक्षा वाहतूक, एसटी व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून नवीन महामार्ग होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. याचा मोठा फटका रिक्षा वाहतूक व विक्रम रिक्षा वाहतूकदारांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्‍यांना कोकण श्रमिक संघ मिनीडोअर चालक-मालक संघटनेने देत आंदालनाचा इशारा दिला होता. त्‍यानुसार रावढळ येथे बुधवारी (ता.१०)सकाळी रास्ता रोको करण्यात आला. या वेळी सव, गोठे, तुडील, रावढळ, वामने, जुई या परिसरातील २० हून अधिक गावातील नागरिक सहभागी झाले होते.

लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
मिनीडोअर संघटनेचे खाडीपट्टा विभाग अध्यक्ष फिरोज देशमुख, रिहान देशमुख, सुनील जाधव आदींसह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आंदोलनादरम्‍यान उपस्थित होते. अखेर आंदोलनाची दखल घेत महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, अभिजित झेंडे व पोलिस अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा केली व आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्याचे व खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर तातडीने दुरुस्तीही सुरू करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com