शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

महाड, ता. १४ (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर दोन जूनला तिथीनुसार तर सहा जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. यंदा शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असल्याने मोठ्या संख्येने शिवप्रेमी किल्‍ल्‍यावर दाखल होणार आहेत. सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये, याकरिता प्रशासन सज्ज झाले असून अधिकाऱ्यांनी रायगड गडावरील तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी केली.
शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहनतळ, रायगडावर येण्यासाठी एसटी वाहतुकीबाबत नियोजन, स्वच्छतागृहे, रायगड रोप वे, गडावरील सुरळीत वीज पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस सुरक्षा व्यवस्था अशा विषयांचा या वेळी आढावा घेण्यात आला. अधिकारी वर्गाने गडावर जाऊन तयारीचा आढावा घेतला. आमदार भरत गोगावले यांनी रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. प्रशासनाच्या तयारीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी दक्षता घेतली जावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
आढावा बैठकीला जिल्हाधिकारी योगेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद तसेच शिवराज्याभिषेक समिती व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

२६ व्यवस्‍थापन समित्‍या
रायगडावरील तयारीसाठी वीज पुरवठा, पाणीपुरवठा, मंडप, अग्‍निशमन, वाहनतळ, परिवहन, रोप वे, पोलिस बंदोबस्त, मदत केंद्र, हेलिपॅड अशा विविध व्यवस्थापनाच्या २६ समित्या स्थापन करण्यात आले आहेत. या समित्यांची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्यावर दिली आहे. त्यामुळे रायगडावरील तयारीमध्ये सुसूत्रता येईल.

महत्त्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक
जिल्हाधिकारी योगेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावरील शिवराज्‍याभिषेक दिन सोहळ्याची तयारी सुरू आहे. खारघर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर रायगडावरील कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, वाहतूक कोंडी, चेंगराचेंगरी तसेच इतर दुर्घटना होऊ नये याची विशेष काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक डॉक्टरांसह कार्यान्वित करण्यात येणार आहे.

..........

रायगडावर शिस्तबद्ध नियोजन करा!
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडा किल्‍ल्‍यावर राज्य सरकारकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा, यासाठी शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक झाली. बैठकीला आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, चित्रपट महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक अविनाश ढाकणे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह रायगडावर दरवर्षी हा सोहळा आयोजित करणारे शिवप्रेमी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सोहळा कसा असेल याचे सादरीकरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com