रायगड किल्‍ल्‍यावरील फुटका तलावाचे संवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड किल्‍ल्‍यावरील फुटका तलावाचे संवर्धन
रायगड किल्‍ल्‍यावरील फुटका तलावाचे संवर्धन

रायगड किल्‍ल्‍यावरील फुटका तलावाचे संवर्धन

sakal_logo
By

महाड, ता. १६ (बातमीदार) : रायगडावरील शिवकालीन तलाव व पाणी साठ्यांचे संवर्धन करून ते पाणी उपयोगात आणण्याचा प्रयत्न रायगड विकास प्राधिकरणच्या मार्फत सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड विकास प्राधिकरण व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्‍ल्यावरील बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या फुटका तलावाचे जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे रायगडावरील जलसंपदा पुन:र्जिवीत होण्यास मदत होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापन धोरणांची अनेक उदाहरणे रायगड किल्‍ल्‍यावर पाहायला मिळतात. सद्यःस्थितीत किल्‍ल्‍यावर तलाव, छोटे-मोठे टाक्या असे एकूण ८४ पाणीसाठे उपलब्ध असून यामध्ये गंगासागर तलाव, हत्ती तलाव, फुटका तलाव, कोलम तलाव, हनुमंत टाके असे प्रमुख पाणीसाठे गडावरील पाण्याची गरज भागवत होते. दोन वर्षापासून सुरू असलेल्या हत्ती तलावाच्या कामाची पूर्तता झाली आहे. गडावर येणाऱ्या लाखो शिवप्रेमींच्या सुविधेसाठी रायगड प्राधिकरणाच्या स्थापनेपासून तलावांच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख तलावांची दुरुस्ती व संवर्धनाची काम सर्वात आधी हाती घेण्यात आले असून फुटका तलावात ४० लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने फुटका तलावाचे जतन व संवर्धन सुरू असून प्रामुख्याने १३ फूट रुंद असलेल्या तलावाच्या भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या तलावाला गळती असून, संरक्षण भिंतीवर झाडेझुडपे व गवत वाढले आहे. सर्वात आधी गाळ काढण्यात आला असून त्यानंतर संरक्षक भिंतीतील झाडाझुडपांमुळे बाहेरील व आतील दगड निखळले आहेत. निखळलेल्या घडीव दगडांचे वर्गीकरण करून त्याला क्रमांक देऊन दस्तावेजीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर हे सर्व दगड एकत्र आणून, दस्तावेजीकरणाच्या माध्यमातून त्याच्या जागा निश्चित करण्यात येणार आहे. संरक्षक भिंतीचे जतन, संवर्धन व गळती रोखण्याचे काम एकाच वेळी पारंपरिक बांधकाम साहित्य म्हणजेच भिजवलेला चुना, सुरखी, बेलफळ व गूळ, रेती यामध्ये करण्यात येणार आहे. तलावाच्या भिंतीवर पाणी झिरपणार नाही, अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. किल्‍ल्‍यावरील अन्य तलावाचेही जतन करण्यात येणार असून या दोन्ही कामांसाठी सुमारे १ ते दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

रायगडावरील शिवकालीन तलाव व पाणीसाठे यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या फुटका तलावाचे संवर्धन केले जात आहे. त्‍यानंतर अन्य तलावांचे, टाक्‍यांचेही संवर्धन व जतन केले जाणार आहे.
- स्वप्नील बुरले, अभियंता, रायगड विकास प्राधिकरण

सोहळ्याची जय्यत तयारी
रायगड किल्ल्यावर दोन जूनला तिथीनुसार तर सहा जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी योगेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्‍याभिषेक दिन सोहळ्याची तयारी सुरू असून यंदा ३५० वे वर्ष असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी वीज पुरवठा, पाणीपुरवठा, मंडप, अग्‍निशमन, वाहनतळ, परिवहन, रोप वे, पोलिस बंदोबस्त, मदत केंद्र, हेलिपॅड अशा विविध व्यवस्थापनाच्या २६ समित्या स्थापन करण्यात आल्‍या आहेत.