
चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी
महाड, ता. १५ (बातमीदार) : पूर्व वैमानस्यातून एका ४५ वर्षीय इसमावर तिघांनी चाकू आणि हॉकी स्टिकने हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
महाड तालुक्यातील किये गावात ही घटना घडली असून गेल्या दोन दिवसांत महाड औद्योगिक पोलिस ठाणे हद्दीत अशा स्वरूपाचे तीन वेगवेगळे गुन्हे घडले असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
याबाबत महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात काशिनाथ रमाकांत मालुसरे (रा. किये) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार रामदास तुकाराम सणस, जानू धोंडीराम मालुसरे व सागर बारकू मालुसरे (सर्व रा. किये) यांना अटक करण्यात आली आहे. रामदास, जानू व सागर यांनी मागील दोन वर्षांपूर्वीचा राग मनात धरून त्याच गावातील गावदेवी मंदिराजवळ रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान काशिनाथ मालुसरे यांच्यावर चाकू आणि हॉकी स्टिकने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. या गुन्ह्याची नोंद महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात झाली असून सर्व हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. महाड औद्योगिक पोलिस ठाण्यामध्ये गेले काही दिवस होत असणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.