कोतुर्डे धरणाने गाठला तळ

कोतुर्डे धरणाने गाठला तळ

महाड, ता. १८ (बातमीदार) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणाची पातळी खालावल्‍याने महाड शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहचू लागली आहे. १५ जूनपर्यंत पाण्याचा साठा पुरण्याची शक्यता कमी असल्याने आतापासून शहरातील अनेक भागात कोतुर्डे धरणातून होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड केला जाणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी याबाबत शहरात जाहीर सूचना व दवंडी पिटवली आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेउन महाड नगरपालिकेने नियोजन केले होते. परंतु वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्‌यात मोठी घट झाली आहे. शहराला कुर्ले, कोतुर्डे व एमआयडीसीतून पाणीपुरवठा होतो. या सर्व ठिकाणाहून दररोज ४०-५० दशलक्ष घनमीटर पाणी शहरात वितरित केले जाते.
कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून शहरात पाणी आणण्यात आले असून बहुसंख्य भागाला याच धरणाचे पाणी पुरवले जाते. मात्र काही दिवसांपासून धरणाने तळ गाठल्‍याने पालिकेच्या जलवाहिनीची पातळीही खाली गेली आहे. धरणातून दोन पंपांनी अहोरात्र पाणी उपसले जाते व ते जलवाहिनीद्वारे शहराला पुरवठा केला जाते. परंतु हा पुरवठा अनियमित आणि कमी दाबाने असल्‍याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्‍यात गुरुवारपासून (ता.१८) पाऊस सुरू होईपर्यंत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्‍याने नागरिक त्रस्‍त आहेत.
सुलतान गल्ली, सरेकर आळी, काजळपूरा, दस्तुरी नाका, चवदार तळे, गोमुखी आळी, कोटेश्वरी तळे, भीमनगर व देशमुख मोहल्ला येथे शुक्रवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा होईल. तर काकरतळे, इंगवले रोड, रोहिदास नगर, वीरेश्वर आवाड, प्रभात कॉलनी, जवाहर कॉलनी, तांबड भुवन परिसर येथे शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. टंचाई निवारणासाठी शहरातील पारंपरिक तळ्यांचा विकास करणे, पालिकेच्या मालकीच्या विहिरी स्वच्छ करणे, यासाठीही पालिकेने पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

कोतुर्डे धरणातील पाणी कमी होत असून पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे यासाठी दिवसाआड पाणी सोडले जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. - रोहित भोईर, पाणीपुरवठा अभियंता, महाड नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com