ऐतिहासिक बारवांचे दस्तऐवजीकरण

ऐतिहासिक बारवांचे दस्तऐवजीकरण

सुनील पाटकर, महाड
इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या विहिरी व बारव काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. अशा ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन करण्याचे काम रायगड जिल्ह्यामध्ये साद सह्याद्री प्रतिष्ठान, मावळा संघटना तसेच इतर संस्थांमार्फत सुरू आहे. परंतु आता बारवांना नवीन ओळख मिळवून देण्यासाठी तसेच पुढील पिढीला या ऐतिहासिक ठेव्याची माहिती मिळावी याकरिता त्‍यांचे दस्तऐवजीकरण करण्याची ‘बाराव संशोधन मोहीम’ राज्यभरात घेण्यात आली आहे. त्यातूनच महाड तालुक्यातील रानवडी पडवळकोंड, पाचाड तसेच माणगाव तालुक्यातील मुगवली येथील बारवांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता गडकिल्‍ल्‍यांवरील हा ऐतिहासिक ठेवा कागदोपत्री जीवंत राहणार आहे.
रायगड जिल्ह्यात लेणी, गुहा, गडकिल्ले, बारव, विहिरी असा मोठा ऐतिहासिक ठेवा असून वेळोवेळी याचा प्रत्‍ययही येतो. काळ्याच्या ओघात नष्ट होणारा हे ठेवा जतन करण्यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत.
ऐतिहासिक विहिरीची काही नैसर्गिक कारणांमुळे पडझड झाली तर ती पुन्हा त्याच स्थितीत निर्माण करता यावी, त्‍यासाठी आवश्‍यक माहिती साठा उपलब्ध असावा, या हेतूने पुरातन बारवांचे आधुनिक पद्धतीने दस्तऐवजीकरण केले जात आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार विहिरींचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम सुरू आहे.
सहा वर्षांपासून रानवडी येथील बारव जतनाच काम साद सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत सुरू आहे. तर तीन वर्षांपासून जिजाऊंचा राजवाडा, यातील तक्क्याची आणि देशमुख हॉटेलसमोर असलेली होळकर बारव जतनाचे काम मावळा संघटनेमार्फत सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी दीपोत्सवही होतो. हा ठेवा पुढील पिढीला माहिती व्हावा यासाठी आता रानवडी, पाचाड व मुगवली येथे मुंबईतील एल.एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरकडून या ठिकाणी पुरातन बारवचे आधुनिक पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. दोन दिवस चाललेल्‍या या उपक्रमासाठी महाराष्ट्र बारव मोहीम आणि रोहन काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
दस्तऐवजीकरण केलेली रानवडी पडवळकोंडमधील बारव ही कोकणातील पहिलीच बारव मानली जात आहे. जर भविष्यात विहिरीची काही नैसर्गिक कारणांमुळे पडझड झाली तर ती पुन्हा त्याच स्थितीत निर्माण करता यावी, त्‍यासाठी माहिती साठा उपलब्ध राहावा, यासाठी एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आधुनिक पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्यात आले.

दस्तऐवजीकरणाचे महत्त्व
प्रत्यक्ष जागेवर जाऊन बारवचे स्थान, तिची लांबी, रुंदी, खोलीची मोजमापे, विहिरीचा व्यास, बांधकामाची रचना, त्‍यात आढळणारी वैविध्य, शिलालेख, कालखंड अशा तपशिलाची नोंद केली जाते. त्यानुसार मोठ्या कागदावर वास्तुकलेचा नमुना रेखाटला जातो. त्यामुळे भविष्यात बारवचा हुबेहूब आराखडा उपलब्ध होऊ शकतो. बारव कशी होती, याची माहिती पुढील काळात डोळ्यासमोर येऊ शकेल, तसेच जतन संवर्धनासाठीही उपयुक्त ठरू शकेल.

महाड ः रानवडी, मुगवली व पाचाड येथील दस्तऐवजीकरणाचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com