शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

महाड, ता. २० (बातमीदार) : रायगड किल्ल्यावर २ आणि ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून तब्बल १ हजार ६०० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता रायगड पोलिसांकडून व शिवप्रेमींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसा एक व्हिडीओदेखील समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आला आहे.
रायगड किल्ल्यावर या वर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. गडावर २ जूनला तिथीनुसार; तर ६ जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे. शिवप्रेमींच्या सोयीसाठी २६ समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्यांमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांवर विविध प्रकारची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवप्रेमींची रायगडावर येण्याकरता कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा याकरता एक हजार ६०० पोलिस रायगड व परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. रायगड व पाचाड या ठिकाणी दोन पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

--------------
पार्किंग व्यवस्था
मुंबई-गोवा महामार्गावरून महाडकडून रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींकरता काँझर या ठिकाणी दोन वाहनतळे; तर वाळसुरे या ठिकाणी एक वाहनतळ उभारण्यात आले आहे. पुणे तसेच अन्य मार्गाने माणगाव निजामपूरमार्गे रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कवळीचा माळ व पाचाड बौद्धवाडी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी, औषधोपचार सुविधा पुरवण्यात येणार आहेत. पार्किंग सुविधांपासून गडावर जाण्याकरता एसटी वाहतूक सुविधा पुरवली जाणार आहे.

-----------------
गडावर जाण्याचे मार्ग
रायगडावर चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग येथून चढण्याची सुविधा आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शिवप्रेमींनी सकाळी गड चढावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे दोन्ही मार्ग महादरवाजा येथे एकत्र येतात. तेथून रायगडावर जाताना महादरवाजा हा एकमेव दरवाजा असल्याने त्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरता विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. रायगडावर जाणाऱ्यांनी पायऱ्यांचा मार्ग वगळता अन्य कोणत्याही धोकादायक मार्गाने येऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

----------------
नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक
रायगड पोलिस नियंत्रण कक्ष - ०२१४१ २२८४७३
भ्रमणध्वनी - ७४४७७११११०
हेल्पलाईन - ११२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com