
शिवरायांना ३५० सुवर्ण होनांचा अभिषेक
महाड, ता. २३ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगड किल्ल्यावर ६ जूनला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या वेळी छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीला शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या ३५० सुवर्ण होनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडावर दर वर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाची राज्यव्यापी बैठक कोल्हापूर तसेच पुणे येथेदेखील पार पडली. या वेळी बैठकीला राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याच्या निमित्ताने गडावर ५ जून व ६ जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्याही स्थापन करण्यात आलेल्या आहेत. अनेक शिवप्रेमींना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. कोल्हापूर येथील बैठकीला युवराज्ञी संयोगिताराजे, युवराजकुमार शहाजीराजे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, समितीचे सर्व कमिटी प्रमुख, इतर पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
प्रतिवर्षी एक सुवर्णहोन वाढणार
या वर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून निर्माण करण्यात आलेल्या सुवर्ण होनांच्या ३५० प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींचा सुवर्णाभिषेक श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीवर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत सुवर्णपेढी असलेल्या चंदूकाका सराफ यांच्या वतीने या प्रतिकृती देण्यात आलेल्या आहेत. प्रतिवर्षी एक सुवर्णहोन प्रतिकृती यामध्ये वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सव समितीकडून या वेळी देण्यात आली.