
गावातच होणार बँक खाते आधारशी लिंक
महा़ड, ता. २४ (बातमीदार) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे ६ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून २०२३ मध्ये जमा होणार आहे. यात लाभार्थ्यांनी त्यांचे पैसे जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केल्याने आयपीपीबीमार्फत (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) गाव पातळीवर बँक खाते आधारशी जोडण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. मोहिमेचा कालावधी ३० मे पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात सद्य:स्थितीत २३ हजार ५ लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. तसेच १२ हजार ४३० लाभार्थ्यांचे इ-केवायसी प्रमाणिकरण झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात १४ व्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाही. लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील टपाल कार्यालयामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे गावातील टपाल विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत आयपीपीबीमध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास आयुक्त कृषी कार्यालयामार्फत गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्तर लाभार्थींशी संपर्क करून बँक खाती सुरू करतील.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत आयोजित मोहिमेमध्ये सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे इ-केवायसी प्रमाणिकरण झालेले नाही, अशा लाभार्थींनी इ-केवायसी प्रमाणिकरण ३० मे पूर्वी करून घ्यावे.
- संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी/जिल्हा समन्वय अधिकारी