
कोकणस्तरीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना
महाड, ता. २४ (बातमीदार) : महाड तसेच परिसरातील तालुक्यांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होत असते. या काळात मदत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व अद्ययावत साधने उपलब्ध व्हावीत यासाठी महाड येथील काकासाहेब चितळे स्मृती केंद्रातर्फे कोकणस्तरीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र महाड येथे स्थापन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ रविवारी (ता.२१) करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील मुरूड, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड आणि पोलादपूर तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड आणि चिपळूण या तालुक्यांना केंद्राच्या वतीने सेवा देण्यात येणार आहे. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघाचे कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव, महाड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष अशोक तलाठी, काकासाहेब चितळे स्मृती केंद्राचे महाडमधील अध्यक्ष धनंजय परांजपे उपस्थित होते तर समारोपप्रसंगी पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, विवेक भागवत उपस्थित होते.
ऋषिकेश यादव यांनी आपत्तीपूर्व, प्रत्यक्ष आपत्ती काळात आणि आपत्तीनंतर उपाययोजना आणि बचाव कार्य कसे करायचे करायचे, याची माहिती दिली. आपत्ती निवारणाचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय परांजपे यांनी प्रास्ताविकात सेवाकार्याची माहिती दिली. उद्घाटन समारंभानंतर महाडजवळच्या सोमजाई मंदिरालगत दरड दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य कसे करायचे याचे तर सावित्री नदी पात्रात पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्य कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. महाड आणि श्रीवर्धन दापोली पोलादपूर, चिपळूण रोहा आणि माणगाव येथील ४५ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
प्रशिक्षणार्थींना दर तीन महिन्यांनी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीना ऋषिकेश यादव , भोसला मिलिटरी अॅडव्हेंचर विद्यालयाचे संतोष जगताप, योगेश सहारे आणि विक्रम बेडकुळे या प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले तर महाड नगरपालिका व महाड उत्पादक संघटनेने साहित्य उपलब्ध करून दिले होते.
महाड ः