खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

महाड, ता. २५ (बातमीदार) : जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या दाव्यात करणाऱ्या व या आधारे मिळकत आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारा जणांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महाडचे तलाठी अजित धाबेकर यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संजय खोडके, संतोष खोडके, सुधीर खोडके, सुजाता खोडके, अमित खोडके, ओंकार खोडके, अमृता बामणे, राहुल पिंपळकर, प्रसाद पिंपळकर, योगिता गुजर, ज्योती वर्णे व रेखा काकडे (सर्व रा. महाड) या बारा जणांचा समावेश आहे.
वरील सर्वांनी ४,१८७ आणि ४,२५० या क्रमांकाचे बनावट फेरफार उतारे तयार करून मिळकत त्यांच्या नावे होण्यासाठी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला होता. ही कागदपत्रे बनावट असतानाही ती खरी आहेत, असे भासवून उपविभागीय अधिकारी यांची फसवणूक केली जात होती. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२० ते १४ मार्च २०२३ या कालावधीत घडला. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून केलेल्या चौकशीमध्ये हे फेरफार बनावट असल्याचे आढळून आल्याने व कार्यालयाची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने तलाठी अजित धाबेकर यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर १२ जणांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com