किल्‍ले रायगडावरील पाणीसाठ्यात घट

किल्‍ले रायगडावरील पाणीसाठ्यात घट

महा़ड, ता. २८ (बातमीदार) : किल्ले रायगडावर असलेले पाणीसाठे वाढत्या उष्णतेने कोरडे पडले आहेत तर काहींची पातळी खालावली आहे. त्‍यामुळे शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यानिमित्त येणाऱ्या लाखों शिवप्रेमींसाठी पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गंगासागर व इतर तलावांतील मर्यादित साठा लक्षात घेता, शिवप्रेमींना गड चढतानाच पाण्याची बाटली दिली जाणार आहे. अशा सुमारे दीड लाख लिटर बाटल्यामार्फत गडावर पाणीपुरवठा केला जाणार आहे.
किल्ले रायगडावर २ आणि ६ जूनला ३५० वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा होत आहे. याकरिता राज्‍य सरकारकडून मोठा गाजावाजा केला आहे. यामुळे मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल होणार असून त्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन महिनाभर मेहनत घेत आहे. वाढत्या उष्म्यामुळे गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यातच प्रशासनाने सूचना देऊनही गंगासागर तलावातून रायगडावरील कामे व रोप वे आणि इतर ठिकाणी होणारा पाणीपुरवठा थांबला नाही. यामुळे गंगासागरमधील पाण्याने आता तळ गाठला आहे.
किल्ले रायगडावरील पाणीसाठ्याबाबत दरवर्षी खातरजमा करूनच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पाण्याचा वापर कसा करावा लागेल, याचे नियोजन जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभाग करते. परंतु यंदा गर्दी वाढणार असल्याने शिवप्रेमी तहानेने व्याकूळ होण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याची सुविधा गंगासागर आणि कोलीम तलावामधून केली जाते, मात्र यंदा तापमान कमालीचे वाढल्‍याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही आटले आहेत. त्यातच गडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू असून त्‍यासाठीही तलावातून पाणी उपसा होत आहे.

सध्यस्‍थितीत गडावर १२ लाख लिटर पाणीसाठा
किल्ले रायगडावर गंगासागर, हत्ती तलाव, बारा टाके, कोलीम तलाव, हनुमान टाके इत्यादी पाणी स्त्रोत आहेत. यापैकी गंगासागर आणि कोलीम तलावातील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी वापरले जाते. मात्र या तलावातील पाण्याची पातळी मे महिन्यात प्रचंड खालावली आहे. शिवजयंती, शिवपुण्यतिथीनिमित्त गडावर पर्यटकांची आणि शिवप्रेमींची गर्दी असते. सद्यस्थिती गडावर १२ लाख लिटर्स पाणी साठा आहे. त्यातच रायगडावर निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता रायगडावर २ व ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पाणी कमी पडू नये यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग प्रयत्न करत आहे.

शिवप्रेमींसाठी पाण्याच्या ४० टाक्‍या
शिवराज्‍याभिषेकदिन सोहळ्यात दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गडावर पाणीपुरवठा केला जातो. यंदा गडावर येणाऱ्या शिवप्रेमींसाठी सुमारे ४० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या जाणार आहेत. जगदीश्वर मंदिर, टकमकटोक, महादरवाजा, होळीचा माळ, चित्त दरवाजा, वाळसूरे खिंड, याठिकाणी या टाक्या ठेवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे २० टँकरच्या माध्यमातून सातत्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाचाडमधील तलावामध्ये टँकरद्वारे पाणी टाकून तलाव भरला जाणार आहे. आरओचे स्वच्छ पाणी सर्वांना दिले जाणार असून यासाठी गडावर तीन आरओ यंत्रे बसवली आहेत.

वाढत्‍या उष्‍म्‍यामुळे गडावरील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. काळा हौद आणि कोलीम तलाव यातून गंगासागर तलावात पाणी आणले जाणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाण्याच्या बाटल्यांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
- जे. यु. फुलपगारे, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com