मृत्‍यूंच्या घटनांच्या चौकशीसाठी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत्‍यूंच्या घटनांच्या चौकशीसाठी समिती
मृत्‍यूंच्या घटनांच्या चौकशीसाठी समिती

मृत्‍यूंच्या घटनांच्या चौकशीसाठी समिती

sakal_logo
By

महाड, ता. ५ (बातमीदार) : तिथीनुसार २ जून तर तारखेनुसार ६ जूनला किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या अपघातांची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
शुक्रवारी (ता. २) ओमकार दीपक भिसे (१९, रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव) यांचा गड चढताना हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तर चार जूनला प्रशांत गुंड (२८, रा. पुणे) यांचा रायगड उतरताना दरड कोसळल्याने मृत्यू झाला. या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्‍यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी, घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची एकसदस्यीय समिती गठीत केली आहे. दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या महाड बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली किंवा नाही, याबाबत चौकशी करणे, सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करून घेणे, सदर घटना कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे, सदर घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे अशा सूचना दिल्‍या आहेत.

सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तत्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल, त्‍यात कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी सूचित केले आहे.