महाड उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञाची नेमणूक
महाड, ता. २० (बातमीदार) : महाड उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापूर्वी पूर्णवेळ स्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराला गती आली असून, रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतींबरोबरच सुमारे सात ते आठ प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील गर्भवतींना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागांमध्ये महिलांची प्रसूती घरामध्ये होण्याचे प्रमाण अधिक असल्याने गर्भवती अथवा जन्मजात बालकाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर सरकारने रुग्णालयामध्येच प्रसूती केली जावी, यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे, परंतु सरकारी रुग्णालयामध्ये प्रसूतीतज्ज्ञाची कमतरता असल्याने गर्भवतींना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्या रत्नागिरीत बदली झाल्यानंतर पूर्णवेळ प्रसूतीतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली होती.
१७ जूनपासून रुग्णालयात डॉ. भानुदास गिरी यांची स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून पूर्णवेळ नेमणूक करण्यात आली असून, ते रुग्णालयाच्या आवारातील सरकारी निवासस्थानातच राहात असल्याने रात्री बेरात्री तत्पर आरोग्यसेवा मिळत असल्याने महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सरकारी रुग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोग प्रसूतीतज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गोरगरीब रुग्णांवर पडणारा अतिरिक्त खर्चाचा भार कमी होणार आहे.
- सिद्धेश पाटेकर, सदस्य, रुग्ण कल्याण समिती, महाड