
थकीत रक्कम मिळण्यापूर्वीच ७३ निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबई - सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (Retired St Employee) निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे (Leave Money) आणि वेतनवाढीतील फरकाचे पैसे महामंडळाकडून (Mahamandal) दिले जातात; मात्र २०१९ पासून राज्यातील तब्बल १० हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना ही रक्कम (Amount) अद्यापही मिळाली नाही. दरम्यान, गेल्या चार वर्षांत ही रक्कम न मिळताच ७३ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी एसटीच्या मुख्यालयात वारंवार चकरा मारत आहेत; मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.
एसटी महामंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २९५ कोटी रुपये देणे थकीत आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.
कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय
सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी गेल्या चार वर्षांत ७३ जणांचा मृत्यू झाला. त्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत. मुळात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन इतरांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कमही कमी मिळते. त्यातच २०१९ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम न मिळाल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे बरगे म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05867 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..