
ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भातील नवीन वेळापत्रक आणि त्याचे नियोजन जाहीर केले आहे. तसेच सर्व परीक्षा या ऑफलाईन घेतल्या जातील, असेही स्पष्ट केले होते. मात्र मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या काही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होत आहेत. त्यामुळे सामंत यांच्या नव्या सूचनांमुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ एप्रिलपासून सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यात काही परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या नव्या सूचनांनुसार सर्व परीक्षा ऑफलाईन घेतल्यास विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे आणि विद्यार्थ्यांचेही गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे; तर दुसरीकडे सामंत यांनी दिलेल्या सूचनांपेक्षा विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विद्यापीठाच्या सुरू असलेल्या सर्व परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडतील, असे स्पष्ट केले आहे.
परीक्षांचे नियोजन
मुंबई विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन, तर कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यित अभ्यासक्रमातील सत्र ६ च्या (चॉईस बेस) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन व प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. त्यात सत्र ६ च्या परीक्षाही ऑनलाईन होत आहेत. त्यात तूर्तास बदल केला जाणार नाही. दुसरीकडे पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र २ नियमित व बॅकलॉग, कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र २ व ४ नियमित व बॅकलॉग, व्यवस्थापन, तंत्रज्ञान व आंतर-विद्याशाखा, व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र १ ते ४ नियमित व बॅकलॉग परीक्षा, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.
कुलगुरूंबरोबरच्या बैठकीनंतर निर्णय
दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर विविध विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान घ्याव्यात, असेही म्हटले होते. मात्र त्यापूर्वीच मुंबईसह इतर विद्यापीठात उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या असून काहींचे नियोजनही पूर्ण झाले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05909 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..