
महाराष्ट्र दिनी भाजपची मुंबईत ‘बुस्टर डोस’ सभा
मुंबई, ता. २८ : मुंबईसह राज्यात आक्रमक झालेल्या भाजपची १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत ‘बुस्टर डोस’ सभा होणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, विविध रंगांचे आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही सभेत करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते आमदार ॲड. आशीष शेलार यांनी दिली. विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
कोरोनानंतर भव्यदिव्य स्वरूपात भाजपतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. १ मे रोजी सोमय्या मैदानावर कार्यक्रम रंगणार असून भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुख त्यात सहभागी होणार आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची ‘बुस्टर डोस’ सभाही या वेळी होणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.
अनेकांचा समाचार घेणार!
गेल्या काही दिवसांत मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून भाजपच्या पोलखोल सभांवर अति‘विराट’ म्हणजे एक-दोन कार्यकर्ते दगड मारत आहेत. त्या सर्वांचा समाचार सभेत घेतला जाईल, असेही शेलार यांनी जाहीर केले. कार्यक्रमात एक तलवार दाखवली म्हणून मोहित भारतीय यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने तलवारीचा साठा सापडला आहे, त्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का, असा सवालही त्यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05917 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..