
सोमय्या पिता-पुत्रांना १४ जूनपर्यंत दिलासा
मुंबई - आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा नगरसेवक मुलगा नील (Neil Somaiya) यांना दिलेला दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज १४ जूनपर्यंत वाढवला. तपास अधिकारी जेव्हा चौकशीसाठी बोलावतील तेव्हा हजर राहू, अशी हमी सोमय्या पिता-पुत्रांनी दिली आहे.
न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे आज सुनावणी झाली. या वेळी सोमय्या न्यायालयात हजर होते. या दरम्यान जर सोमय्या यांना अटक झाली, तर ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
माजी लष्करी जवान बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी सोमय्या यांनी २०१३ मध्ये सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केला होता. त्यासाठी रेल्वेस्थानकांबाहेर आणि सोशल मीडियावर मोहीम राबवण्यात आली. मात्र, जमलेला निधी राज्यपालांकडे अधिकृतरीत्या सोपवण्यात आला नाही, असा आरोप भोसले यांनी केला आहे. त्याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून सोमय्या यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सोमय्या यांनी ५७ कोटी जमा केल्याचे खंडन केले असून केवळ ११ हजार रुपये जमा झाल्याचा दावा केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05925 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..