हुतात्मा स्मारकाचे आम्ही पहारेकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुतात्मा स्मारकाचे आम्ही पहारेकरी
हुतात्मा स्मारकाचे आम्ही पहारेकरी

हुतात्मा स्मारकाचे आम्ही पहारेकरी

sakal_logo
By

- मिलिंद तांबे, मुंबई

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात २१ नोव्हेंबर १९५५ आणि त्यानंतर पुढील आंदोलनात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने २१ नोव्हेंबर १९६१ ला हुतात्मा स्मारकाची उभारणी केली. स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या ‘अ’ विभाग कार्यालयाकडे आहे. उद्यान, रंगकाम आणि मेस्त्री विभागातील पाच शिलेदार या हुतात्मा स्मारकाची निगा राखण्याचे काम करतात. हेच पाच शिलेदार खऱ्या अर्थाने हुतात्मा स्मारकाचे ‘पहारेकरी’ आहेत.
महापालिकेच्या अभियांत्रिकी आणि उद्यान विभागाकडून स्मारकाची देखरेख केली जाते. यासाठी पालिकेने आपल्या काही कर्मचाऱ्यांची कायम स्वरूपी नियुक्त केली आहे. पुतळ्याची निगा, स्मारकाचे रंगकाम, स्मारकातील बगिचा, धगधगती मशाल आणि झाडांना पाणी देण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे.

सुरेश सरवणकर, सुपरवायझर
हुतात्मा स्मारकाच्या सर्व कामांवर देखभाल ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आता मी दोन महिन्यांनी कर्तव्यवरून निवृत्त होणार आहे, पण नोकरीतील सर्वाधिक वर्षे मी हुतात्मा स्मारकात काढली आहेत. आमच्या अभियांत्रिकी, उद्यान, मेस्त्री, सुरक्षा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना कामे वाटून दिली आहेत. प्रत्येक जण नेमून दिलेली काम इमाने-इतबारे करतो. स्मारकातील काम ही मोठी जबाबदारी आहे असे वाटते. इतर दिवशी कार्यालयीन वेळेनुसार काम केले जाते; मात्र महाराष्ट्र दिनाच्या वेळी सतत दोन दिवस दिवस-रात्र थांबावे लागते; मात्र हे काम आम्ही आमचे भाग्य समजतो. स्मारकाच्या ठिकाणी कायम धगधगणारी ज्योत आहे. तिच्यावर लक्ष ठेवून तिची निगा राखली जाते. कधी काही समस्या आली तर संबंधित कंपनीला कळवले जाते. ज्योत सदैव धगधगत राहावी यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवले जाते. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या आठवणीत राहायला मिळते, याहून वेगळे समाधान काय असू शकते. निवृत्त झाल्यानंतर हुतात्मा स्मारकाची सेवा करता येणार नाही, याची खंत आहे.

- दीपक झगडे, रंगारी
गेली २५ वर्षे हुतात्मा चौकातील रंगरंगोटीचे काम मी करतो. कोरोना काळातदेखील हे काम थांबले नाही. हुतात्मा स्मारकाची वर्षातून दोनदा म्हणजे २१ नोव्हेंबर आणि १ मे या दिवशी रंगरंगोटी केली जाते. हुतात्म्यांच्या शिल्पाला धुऊन विशेष रंग लावला जातो. त्यासाठी वेगळे पथक आहे. माझ्याकडे स्मारकाचा चबुतरा आणि हुतात्म्यांच्या नावांची रंगरंगोटी करण्याचे काम असते. या कामासाठी साधारणतः पाच दिवसांचा कालावधी लागतो. सुरुवातीला सर्व परिसर स्वच्छ धुऊन घ्यावा लागतो. त्यानंतर रंगकाम सुरू केले जाते. सध्या प्रचंड ऊन आहे. या उन्हात हे काम करावे लागते. उष्णता वाढल्याने अंगातून घामाच्या धारा वाहतात; तर पायाच्या तळव्यांना चटकेही बसतात; मात्र त्याचे काही वाटत नाही. हुतात्म्यांच्या नावावरून हात फिरवताना ऊर भरून येतो. अभिमान वाटतो. मी नशीबवान आहे म्हणूनच मला हे काम करण्याची संधी मिळाली.

- सुरेश दळवी, माळी
स्मारकातील माळी कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे. स्मारकात वर्षभर काम सुरू असते. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ हे काम मी करत आहे. स्मारकातील उद्यान सुशोभित राखणे हे माझ काम. खुरपे, कैचीच्या साह्याने स्मारकातील गवत आणि विविध रोपांचे ट्रीमिंग करावे लागते. वर्षभर हे काम चालते. यामुळे स्मारक खुलून येते. त्यात आमचा हातभार लागत असल्याने याचा एक वेगळा आनंद आम्हाला आहे. इतकी वर्षे येथे काम करत असल्याने आता आमचेही या हुतात्म्यांशी नाते जुळले आहे.

- बाळू साबळे, माळी
स्मारकातील उद्यान, झाडांची निगा राखण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मी ठाण्याला राहतो; मात्र नित्यनेमाने उद्यानात आम्ही पोहोचतो. वर्षातून दोनदा म्हणजे २१ नोव्हेंबर आणि १ मे या दिवशी येथे उत्सवी वातावरण असते. अनेक नागरिक या दोन दिवसांत येतात. त्यामुळे स्मारकाची आणि उद्यानाची व्यवस्था चोख ठेवावी लागते. संपूर्ण उद्यानाला पाणी मारून स्वच्छ केले जाते. उद्यानातील मार्बल धुऊन स्वच्छ केले जाते. घरातील सदस्य, मित्र, नातेवाईकांकडूनही तयारीची विचारपूस केली जाते. त्यामुळे आम्हालाही मनात समाधान वाटते. नोकरीतील जितकी वर्षे उरली ती सर्व याच कामी लागावी, असे मनापासून वाटते.
- सुरेश खेत्रे, माळी
स्मारकाला भेट द्यायला, पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे स्मारक आणि उद्यान नेहमी व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आमची असते. स्मारक तसे विस्तीर्ण जागेत आहे. आत मोठ्या प्रमाणावर लॉन आहे. ते कैचीने कापून व्यवस्थित केले जाते. तासन् ‌तास वाकून किंवा बसून कैची चालवावी लागते. यामुळे खांदे भरून येतात. पाठही दुखते. आता ऊन असल्याने त्याच्या झळा वेगळ्या, पण या कामाचा आम्हाला कधी त्रास वाटला नाही. कारण हा त्रास या हुतात्म्यांनी भोगलेल्या त्रासापुढे काहीही नाही. येथे काम करत असल्याने अनेक नागरिक आमच्याकडे आदराने बघतात. अनेक पर्यटक सेल्फीदेखील घेतात. त्यामुळे मनोमनी बरे वाटते; मात्र आम्हाला मिळणारा हा मानदेखील या हुतात्म्यांमुळेच आहे. त्यामुळे त्यांना, त्यांच्या संघर्षाला वारंवार नमन करावेसे वाटते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05961 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top