
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी फैसला राणे दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी फैसला
मुंबई, ता. ३० : ‘मातोश्री’ निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह धरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला आज दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय सोमवारी (ता. २) त्याबाबतचा फैसला सुनावणार आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना अजून दोन दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे.
केवळ हनुमान चालिसा ‘मातोश्री’ निवासस्थानी म्हटली म्हणून राजद्रोहाचा आरोप कसा काय लागू शकतो, असा सवाल आज राणा पती-पत्नीच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आला. हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध नाही, तर ती कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या उद्देशाने म्हणत आहोत हेही महत्त्वाचे आहे, असे प्रत्युत्तर राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज विशेष न्या. आर. एन. रोकडे यांच्यापुढे सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. आज राणा यांच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी बाजू मांडली. केवळ एखादा विचार गुन्हेगारी स्वरूपात असला तरी त्यासाठी कोणतीही कृती केली नाही. प्रत्यक्षात तो विचारही अमलात आणला नाही; मग राजद्रोहाचा आरोप कसा लागू शकतो, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला. चालिसा म्हणण्यात गैर काय आहे? जर एखाद्या मशिदीबाहेर चालिसा पठण केले असते तर कदाचित धार्मिक तणावाच्या दृष्टीने ते गैर ठरले असते; पण ‘मातोश्री’बाहेर ती वाचण्यात गैर काय? सरकारविरोधात बोलल्यामुळे राजद्रोहाचा आरोप का लावला जातो? असे सवाल राणा यांच्या वतीने करण्यात आले.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवादाचे खंडन केले. चालिसा पठण कुठे आणि कोणत्या हेतूने केले जात आहे हेही महत्त्वाचे आहे. चालिसा पठण अधिकार असला तरी ते कुठे करायचे यासाठी कायदेशीर परवानगी आणि अधिकृतपणे संमती घ्यायला हवी, असे घरत यांनी सांगितले. राणा यांच्याविरोधात यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह १७ तक्रारी आहेत. नवनीत यांच्यावर सहा तक्रारी आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले. सोमवारी न्यायालय फैसला सुनावण्याची शक्यता आहे.
सरकारबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले!
सध्या हिंदुत्व कार्ड वापरून महाविकास आघाडी सरकार हिंदूविरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच अमरावतीहून राणा दाम्पत्याला हजारो समर्थकांसह ‘मातोश्री’बाहेर चालिसा म्हणायची होती. त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरले, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05971 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..