
केंद्राच्या निषेधात कामगार रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कामगार कायद्यांविरोधात सर्व कामगार संघटना एकवटल्या असून या संघटना संयुक्तपणे १ मे रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. कामगार संघटना जुने कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून केंद्राच्या निषेधार्थ पुणे-मुंबई दुचाकी रॅली काढण्यात येणार आहेत.
पुण्यातील पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात रविवारी सकाळी दुचाकी रॅलीला सुरुवात होईल. मुंबईतील आझाद मैदान येथे दुपारी या रॅलीचे सभेत रूपांतर होईल. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली आहे.
पुण्यातून निघणाऱ्या या रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील कामगार संघटना आणि रायगड, ठाणे, नवी मुंबई व मुंबईतील कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. पिंपरीतून किमान एक हजार दुचाकी रॅली मुंबईकडे रवाना होतील. आझाद मैदानापर्यंत त्यांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त राहणार असल्याची शक्यता आहे.
हुकूमशाही पद्धतीने कायदे संमत!
देशातील कोणत्याही कामगार संघटनांची मागणी नसताना, कोरोना काळात सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प असताना केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांना किंवा कोणत्याही कामगार संघटनांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने नवीन कामगार कायदे संसदेमध्ये संमत केले. हा देशातील कष्टकरी कामगारांचा विश्वासघात आहे. या नवीन कामगार कायद्यांमुळे कायम कामगार ही संज्ञा नष्ट होणार असून भविष्यात सर्व पिढ्यांचे आर्थिक, सामाजिक स्थैर्य यामुळे संपुष्टात येईल. त्यामुळे पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत, या मागणीसाठी रविवारी होणाऱ्या पुणे-मुंबई दुचाकी रॅलीमध्ये सर्व संघटित व असंघटित कामगारांनी सहभाग घेऊन केंद्राचा निषेध करावा, असे आवाहन डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05972 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..