
कामे निकृष्ट आढळल्यास बिल देऊ नये
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेकडून दर वर्षी मिठी नदीच्या सफाईचे काम हाती घेतले जाते. नदीची स्वच्छता योग्य प्रकारे न झाल्यानेच दर वर्षी पुराचा मुंबईकरांना फटका बसतो. त्यासाठी मिठी नदीच्या साफसफाईच्या कामावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हे काम समाधानकारक नसल्यास किंवा निकृष्ट दर्जाचे आढळल्यास कंत्राटदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
मुंबई महापालिकेकडून मिठी नदी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. मिठी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र सुमारे ७ हजार २९५ हेक्टर असून या नदीतून आजूबाजूच्या परिसरातील मलजल व औद्योगिक सांडपाणी १२ महिने मिठी नदीतून प्रवाहित होते. हे पाणी मिठी नदीवरील बापट नाला व सफेद पूल नाल्यामधील सांडपाण्याचा प्रवाह बोगद्याद्वारे धारावी मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्याच्या कामासाठी स्थायी समितीने ११ ऑगस्ट २०१९ ला मंजुरी दिली आहे; मात्र हे काम समाधानकारक केले जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक राहिवाशांकडून केल्या जात होत्या.
काँग्रेसने या तक्रारीची दखल घेतली आहे. विशेष म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत असल्यामुळेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याची शक्यता रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदाराने मागील ५ वर्षांत कोणकोणत्या ठिकाणी कामे केलेली आहेत, ती कामे समाधानकारक पूर्ण केली आहेत का, असा प्रश्न विचारत याबाबत दक्षता विभागाकडून चौकशी करण्यात यावी व नदीच्या स्वच्छतेची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे समोर आल्यास त्याची बिले कंत्राटदाराला दिली जाऊ नयेत, अशी मागणीही रवी राजा यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06024 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..