
फांद्या छाटणीकडे खासगी सोसायट्यांची पाठ
मुंबई, ता. ३ : पावसाळ्यात झाडे कोसळून हानी होऊ नये म्हणून खासगी सोसायट्यांना धोकादायक वृक्ष व फांद्या स्वखर्चाने छाटण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. त्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने नोटिसाही बजावल्या आहेत; मात्र सोसायट्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असून झाडे तोडण्यासाठी येणारा खर्च पालिकेने करावा, अशी मागणी केली आहे. पालिका मात्र खर्च सोसायट्यांनी करण्याबाबत आग्रही आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेच्या उद्यान विभागातर्फे धोकादायक झाडे व फांद्या छाटण्यात येत आहेत. १५ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. सार्वजनिक ठिकाण व रस्त्यालगतच्या झाडांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे राखण्यात येते; मात्र गृहनिर्माण सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था आणि खासगी जागांच्या परिसरात असणाऱ्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी संबंधित मालकाची असते. पालिकेच्या पूर्वपरवानगीने अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य पद्धतीने छाटाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मरण पावलेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबतही विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही आवाहन उद्यान विभागाने केले आहे.
खासगी सोसायट्यांना पालिकेच्या परवानगीने झाडांची छाटणी करता येते; मात्र एका झाडाच्या छाटणीसाठी साधारण आठ ते १० हजार रुपये खर्च येतो. सोसायटीमधील १० ते १५ झाडे जरी छाटली तरी त्याचा खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे सोसायट्यांमधील समिती एवढ्या खर्चाला परवानगी देत नाही. त्यामुळे खासगी सोसायट्यांमधील झाडांच्या बाबतीत मोठा पेच तयार झाला आहे, असे काही सोसायट्यांच्या सभासदांचे म्हणणे आहे. त्याबाबत बोलताना शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ म्हणाले, की काही सोसायट्यांनी पालिकेने वृक्षतोड करून घेण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्याबाबत महासभेत ठरावाची सूचनाही मांडण्यात आली आहे. त्यावर आयुक्तांनी लवकर निर्णय घेऊन धोरण बनवणे महत्त्वाचे आहे.
माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी मात्र पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पालिका जर संपत्ती कर वसूल करत असेल, तर छाटणी करण्याचे कामही त्यांनी करायला हवे. खर्चाचा भुर्दंड रहिवाशांवर टाकणे योग्य नाही. पालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे असेही ते म्हणाले.
मुंबईत आम्ही पाच हजारांहून अधिक सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. पावसाळ्यात झाड कोसळून हानी होऊ नये म्हणून पालिकेची परवानगी घेऊन छाटणी करून घायला हवी. एखादी दुर्घटना घडल्यास सोसायटीवर कारवाई होऊ शकते.
- जितेंद्र परदेशी, अधीक्षक, उद्यान विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06036 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..