
बाळा नांदगावकर यांच्यासह शंभर मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस
मुंबई, ता. ३ : मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासह काही मनसे नेत्यांना सीआरपीसीच्या कलम १४९ अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मुंबईत मनसेचा प्रभाव असलेल्या भागात पोलिस अलर्टवर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी दादर, माटुंगा, शिवाजी पार्क आणि धारावी परिसरातील मनसेच्या १०० पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा जारी केल्या आहेत. शिवाजी पार्क पोलिसांनी नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आदींसह १२ पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याशिवाय दादर भागात अजून १५ पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मध्य मुंबईमध्ये मनसेचा प्रभाव चांगला आहे. त्यामुळे त्या भागात कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
महेंद्र भानुशाली ताब्यात
चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भानुशाली आपल्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले असता तेथेच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भानुशाली यांनीच पहिल्यांदा मशिदीसमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून काही भोंगेही जप्त केले आहेत.
राज ठाकरेंच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची गर्दी
भोंगा आंदोलनानंतर राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी धाव घेतली. कार्यकर्त्यांनी तिथे मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याचा दिलेला अल्टिमेटम मंगळवारी संपत आहे. त्यामुळे पुढे कशा प्रकारे आंदोलन करायचे याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी सकाळी बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत उपस्थित होते.
पोलिस राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. नोटिसा बजावून मनसैनिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र अशा नोटिसांची आम्हाला सवय आहे. पोलिसांनी त्यांचे काम करावे, आम्ही आमचे करणार.
- यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, मनसे
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06038 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..