
ताम्हण फुलांनी मुंबई न्हाली
मुंबई, ता. ३ : महाराष्ट्राचे राज्य फूल म्हणून ओळख असलेला ताम्हण वृक्ष मुंबई महापालिका मुख्यालयासह मुंबईतील अनेक भागांत डौलाने बहरला आहे. राज्य फूल असल्याने महापालिकेकडून ताम्हण वृक्षाची शहरात सर्वत्र लागवड केली आहे. सध्या मुंबईत सहा हजार ५६८ ताम्हण वृक्ष असून त्याच्या फुलांच्या बहरात मुंबई न्हाऊन निघाली आहे.
मे महिन्यात तापमान वाढल्याने अनेक जण आडोशासाठी झाडांचा आधार घेतात. अशा वेळी रस्त्याच्या दुतर्फा जांभळ्या फुलांना बहरलेले ताम्हण वृक्ष वाटसरूंना दिलासा देतात. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या आसपास बहरणाऱ्या ताम्हण वृक्षाच्या फुलाला महाराष्ट्राच्या राज्य फुलाचा मान मिळाला आहे. डोईवर लालसर, जांभळ्या, गुलाबी फुलांचा नाजूक सुंदर मुकुट परिधान केलेला हा वृक्ष उन्हाळ्यात लक्ष वेधून घेतो. झालरीसारखी दुमड असलेल्या सहा किंवा सात नाजूक तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. त्यामुळे ‘क्वीन ऑफ क्रेप मर्टल’ म्हणून हे फूल प्रसिद्ध आहे. हिंदीत त्याला ‘जारुल’, तर लॅटिनमध्ये ‘लँगस्ट्रोमिया स्पेसिओसा’ असे म्हणतात.
---
औषधी गुणधर्मही
ताम्हण वृक्षाच्या पानात आणि फळात हायपोग्लिसेमिक हे मधुमेहावर गुणकारी द्रव्य आहे. झाडाच्या सालीचा काढा ताप आल्यास देतात. झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार, लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम कोरीव काम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. त्यामुळे बंदरांमध्ये खांब रोवण्यासाठी व जहाजबांधणीसाठी ताम्हण वृक्षाचे लाकूड वापरतात.
----
राज्य फूल असल्याने मुंबई महापालिकेकडून ताम्हण वृक्षाची रस्ते, उद्यानांसह सर्वत्र लागवड केली आहे. मुंबईत एकूण ६५६८ ताम्हण वृक्ष आहेत.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, महापालिका
....
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06041 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..