महिलांची मेट्रोकडे पाठ; भाडे महाग असल्याचे ६९ टक्के जणींचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना मेट्रो प्रवास अधिक सोयीचा व सुलभ होण्यासाठी मेट्रोने प्रवास न करणाऱ्या महिलांची मते जाणून घेतली
महिलांची मेट्रोकडे पाठ

महिलांची मेट्रोकडे पाठ; भाडे महाग असल्याचे ६९ टक्के जणींचे मत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महिलांना मेट्रो प्रवास अधिक सोयीचा व सुलभ होण्यासाठी मेट्रोने प्रवास न करणाऱ्या महिलांची मते जाणून घेतली असता तब्बल ६९ टक्के महिलांनी मेट्रोचे भाडे परवडणारे नसल्याचे सांगितले. तसेच ३५ टक्के महिलांना स्थानकांकडे जाणारे मार्ग असुरक्षित वाटत आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिला मेट्रोचा वापर करून कामावर जातात त्या पुरुषांच्या तुलनेने २१ टक्के अधिक खर्च करत असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी (ता. २) जेंडर इन्क्लुसिव्ह फ्युचर ट्रान्सपोर्ट (गिफ्ट) प्रकल्पातील निरीक्षणे प्रकाशित केली. हा उपक्रम युके सरकारच्या सहकार्याने आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (डब्ल्यूआरआय) सहयोगाने राबवण्यात आला. या उपक्रमात पुरुष व महिलांच्या प्रवासातील गरजांमधील फरकासंदर्भात संशोधन करण्यात आले. जगभरातील सार्वजनिक वाहतुकीचे कामकाज व नियोजन हे आकडेवारीच्या आधारे व स्वयंचलित करण्यावर भर देण्यात येत आहे; पण लिंगाधारित आकडेवारी नसल्यामुळे महिला व इतर गटांच्या गरजांकडे अनवधानाने दुर्लक्ष होऊ शकते.

त्यामुळे एमएमआरडीएने लिंगाधारित निरीक्षणे नोंदवली आहेत. या संशोधनामुळे प्रवासाचे पॅटर्न, निर्णयप्रक्रिया आणि सुरक्षेबद्दल असलेला दृष्टिकोन या घटकांबाबत लिंगाधारित फरक मान्य करणारी एमएमआरडीए ही देशातील पहिली एजन्सी ठरली आहे. या अहवालात विविध निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यामध्ये पुरुष कामावर जाण्यासाठी आणि इतर भेटीगाठींसाठी मेट्रोचा वापर करतात, तर महिलांकडून खरेदी करणे, डॉक्टरकडे जाणे इत्यादी कामांसाठी मेट्रोचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. महिला बहुतेक वेळा जड पिशव्या किंवा लहान मुलांसमवेत मेट्रो प्रवास करतात. सुमारे ७६ टक्के महिला आणि ६४ टक्के पुरुष लहान मुलांसमवेत मेट्रोने प्रवास करतात. लहान मुलांसोबत प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी व सुरक्षा तपासणी करताना प्राधान्य आणि आरक्षित आसनव्यवस्था मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुविधेपेक्षा सुरक्षा महत्त्वाची...
- ७८ टक्के महिला महिलांच्या डब्यातून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. यासाठी सुविधेपेक्षा सुरक्षा हे अधिक महत्त्वाचे कारण असल्याचे महिलांनी दिले आहे. स्थानकांकडे जाणारे मार्ग असुरक्षित असल्याचे ३५ टक्के महिलांना वाटते. याच मार्गांवर ५० टक्क्यांहून अधिक पुरुषांना पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वाटते.
- वेळ कमी असल्याने, वैयक्तिक सुरक्षेसाठी, सोबत असलेल्या लहान मुलांमुळे आणि एकाच प्रवासात अनेक कामे पूर्ण करायची असल्याने महिलांना खर्चिक किंवा विविध प्रवास पर्यायांची निवड करावी लागते. दुसरीकडे मेट्रोने प्रवास न करणाऱ्या ६९ टक्के महिलांनी सांगितले की, मेट्रो न वापरण्यासाठी त्याचे भाडे महाग असणे हे प्रमुख कारण आहे.
- ३५ टक्के महिला आणि ३८ टक्के पुरुष त्यांची तिकिटे किंवा कार्डखरेदी पूर्णपणे डिजिटल मोडच्या माध्यमातून करतात. गृहिणी वगळता महिलांचे डिजिटल सुविधा वापरण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. ६५ टक्के गृहिणी तिकीट खरेदी करण्यासाठी नेहमी तिकीट खिडकीवर जातात.

अतिगर्दी म्हणजे शोषणाची अधिक शक्यता...
महिलांनी त्यांचा प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी सुरक्षा, अधिक चांगली प्रकाशयोजना, गर्दीची हाताळणी या मुद्यांची शिफारस केली आहे. पुरुषांनी अधिक सुविधा, नामफलक आणि गर्दीच्या व्यवस्थापनाला प्राधान्य दिले. सध्या सुरू असलेली कोरोना महामारी हे पुरुषांना गर्दीविषयी असलेल्या काळजीचे कारण होते, तर अतिगर्दी म्हणजे शोषणाची अधिक शक्यता हा महिलांचा दृष्टिकोन होता.


कामकाजामध्ये महिलांची संख्या वाढवणार
एमएमआरडीए आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले की, या अहवालातून या एजन्सीच्या लिंगाधारित धोरणाविषयी माहिती मिळेल. यात पुरुष आणि महिलांवर या धोरणाच्या होणाऱ्या परिणामांविषयीच्या निरीक्षणाची आकडेवारी नियमितपणे संकलित
करण्याची गरज नमूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्थानक नियंत्रक, सुरक्षा कर्मचारी, तिकीट सेवा देणारे कर्मचारी इत्यादी कामकाजामध्ये महिलांची संख्या वाढवण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. तसेच या अहवालामुळे महिलांच्या गरजा समजून घेण्यात व त्यांना सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06043 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top