
‘एमटीडीसी’चे बुकिंग हाऊसफुल्ल एमटीडीसीचे बुकिंग ‘हाऊसफुल्ल’
मुंबई, ता. ३ : कोरोना काळात घरात बसून कंटाळलेले पर्यटक उन्हाळी सुट्ट्यांची मजा निसर्गाच्या सान्निध्यात घालवत आहेत. परिणामी, राज्यभरातील एमटीडीसीचे रिसॉर्ट पुढील एक महिना हाऊसफुल्ल झाले आहेत. कोकणासह पुणे, नागपूर आणि चंद्रपूरमधील पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट आणि रिसेप्शन पार्टीसाठी आपल्या पर्यटक निवासांमध्ये रिसॉर्ट आणि लॉन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी दिली.
कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे आदी ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. नाशिक, लोणावळा (कार्ला), गणपतीपुळे आणि तारकर्लीमध्ये महामंडळाची जल पर्यटन केंद्रे असून त्या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत. रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणेही पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. नाशिक विभागातील ग्रेप पार्क आणि भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर अन् लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान आदी स्थळांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय नागपूर व चंद्रपूरमध्येही पर्यटक वाढले असून व्याघ्र सफरीला अधिक पसंती मिळत आहे.
कोरोनानंतर एमटीडीसीची सर्वच पर्यटक निवासे व रिसॉर्टमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्यासाठी एमटीडीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि विविध उपक्रमांचे अत्याधुनिक प्रशिक्षणही दिले आहे. त्यामुळे पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा मिळत आहे. वाढता प्रतिसाद पाहून एमटीडीसीने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची सोय केली असून त्यांनाही तब्बल दोन वर्षांनंतर निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येत आहे.
राज्यभरातील ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन आदी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग आणि रिसेप्शन फोटो शूट, कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’साठी महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत आहे. पर्यटकांचा प्रतिसाद बघून एमटीडीसीने पुढील मार्चपर्यंतचे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे.
डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट आणि रिसेप्शनच्या बुकिंगसाठी सर्वाधिक विचारणा होत आहे. पर्यटकांना आवश्यक माहिती तसेच ऑनलाईन बुकिंग करून देण्याची सोयही आम्ही केली आहे. पर्यटकांचा प्रतिसाद बघून पुढील मार्चपर्यंतचे बुकिंग आम्ही सुरू केले आहे.
- दिनेश कांबळे, व्यवस्थापक, एमटीडीसी
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06045 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..