
बीएसएनएल, एमटीएनएलचे पुनरुज्जीवन करा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.४ : देशातील बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या पुनरुज्जीवन करण्याच्या मागणीची आठवण माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून दिली आहे. केंद्र सरकरकडे आतापर्यंत अनेकदा मागणी केली; मात्र केंद्रातील सरकार भोंगे वाजवण्यात व्यस्त आहे. त्यांना बीएसएनएल आणि एमटीएनएलचे घेणे-देणे नसल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा केंद्र सरकारला आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असल्याची माहिती अरविंद सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
उरलेल्या कर्मचाऱ्यांसह दोन्ही कंपन्या भविष्यात कशा चालतील याचा विचार मंत्रालयाने किंवा तथाकथित सल्लागारांनी केला नाही, अशी टीका त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली. एमटीएनएलला जगवण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे सावंत यांनी पत्रात लिहिले आहे. एमटीएनएलच्या मालकीचे मोक्याचे भूखंड आहेत. केंद्र सरकारने या मालमत्तेतून कमाई करावी. तोपर्यंत फायबर ऑप्टिक केबल्ससारख्या नवीन उपकरणांच्या खरेदीसाठी आणि नवीन सेल टॉवर्सची स्थापना करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याची गरज सावंत यांनी व्यक्त केली. सध्या कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटीत जमा असलेला पैसे वापरण्याची वेळ एमटीएनएलवर आल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
--------
पत्रातील ठळक मुद्दे
- मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये सेवा देणाऱ्या एमटीएनएलमध्ये सध्या बाराशे कर्मचारी काम करतात.
- २००८ मध्ये एमटीएनएलला २०८ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
- थ्रीजी नेटवर्क परवान्यासाठी तत्कालीन सरकारने परवाना शुल्क म्हणून १० हजार कोटी रुपये देण्यास भाग पाडले.
- सरकारने हा परवाना मोफत दिला नाही.
- एमटीएनएलला बाजारातून कर्ज घेऊन पैसे उभे करण्यास सांगितले. त्यामुळे एमटीएनएल तोट्यात गेली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06049 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..