
पर्यावरण रक्षण, अग्निसुरक्षेचे विद्यार्थ्यांना धडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : जागतिक तापमानवाढ अर्थात ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या समस्येमुळे पर्यावरणाविषयीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगभरात नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेदेखील विद्यार्थ्यांना ‘पर्यावरण रक्षणाचे धडे’ देण्याचे ठरवले आहे. यासोबत अग्निसुरक्षेची माहितीदेखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
सध्याच्या आधुनिक युगात मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने कात टाकली असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंप्युटराईज शिक्षण दिले जात आहे. यासह ब्रिटिश कौन्सिल तसेच बॉम्बे स्टॉक एक्सेंज आदींच्या माध्यमातून इंग्रजी भाषेसह आर्थिक व्यवहाराचे धडेदेखील दिले जात आहेत. यासोबत आता विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक कामांची ओढ निर्माण व्हावी यासाठी उद्यानातील कामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
पालिकेच्या विविध उद्याने आणि नर्सरीचा उपयोग अभ्यासासाठी केला जाणार आहे. विविध रोपांचे प्रकार, त्यांचे महत्त्व, बिया-रोपे लावण्याची पद्धत, त्यांची घ्यायची काळजी आदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी दिली. पर्यावरणासह अग्नी सुरक्षेविषयीची माहितीदेखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. सध्या शहरांमध्ये आगीचे सत्र वाढले आहे. त्यात घरात लागणाऱ्या आगीचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे लहान मुलांना विद्यार्थीदशेपासूनच अग्निसुरक्षेची धडे देणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जवळच्या अग्निशमन दल कार्यालयात नेऊन त्यांचे कामकाज तसेच तंत्रज्ञान-यंत्रांची माहिती दिली जाईल.
व्यावहारिक ज्ञानाचा फायदा
विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे. या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात होणार आहे. यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक बनवण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांची माहिती दिली जाणार आहे. यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार असून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06050 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..