
मशिदींवरील ९० टक्के भोंगे वाजलेच नाहीत
मुंबई, ता. ४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात एल्गार पुकारत ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. बुधवारी (ता. ४) ९० टक्के मशिदींवरील भोंगे वाजलेच नाहीत. महाराष्ट्र मुस्लिम संघ आणि इतर संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसले.
मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार मुंबईत ११४० छोट्या-मोठ्या मशिदी आहेत. त्यातील केवळ १३५ मशिदींवर सकाळी भोंग्यांवर अजान झाली. बाकी ९० टक्क्यांहून अधिक मशिदींवरील भोंगे बंद ठेवण्यात आले होते. आजची अजान शांततेत पार पडली. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मशिदीबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक जमून वातावरण चिघळण्याची शक्यता होती. मात्र, कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुस्लिम संघटनांनी सावध भूमिका घेतली. महाराष्ट्र मुस्लिम संघाने मुंबईत विविध समाजांच्या बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केल्याची माहिती महाराष्ट्र मुस्लिम संघाचे प्रमुख एम. एम. ठाकूर यांनी दिली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन सर्वांनी करायला हवे. मुस्लिम समाज आजच्याप्रमाणेच पुढेही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करील, असेही ठाकूर यांनी सांगितले.
भोंग्याचा विषय सामाजिक आहे; परंतु त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे, ही भूमिका सर्वांना पटल्यामुळे अजानच्या वेळी आवाज निर्धारित निर्देशानुसार ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या मशिदींवर अद्याप भोंगे असतील त्यांनाही समजावण्याचा प्रयत्न करू, असे मुरुद्दीन नाईक यांनी सांगितले.
संवाद साधण्यावर भर
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलल्यापासून मुस्लिम समाजाने बैठकांचे सत्र सुरू केले. मौलवी, विविध संघटना आणि तरुणांशी संवाद साधून न्यायालयाच्या निर्देशांची माहिती देण्यात आली, असे मुरुद्दीन नाईक यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06054 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..