राणा दाम्पत्याला सशर्त जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणा दाम्पत्याला सशर्त जामीन
राणा दाम्पत्याला सशर्त जामीन

राणा दाम्पत्याला सशर्त जामीन

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : ‘मातोश्री’ निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना आज विशेष सत्र न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर केला. पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करण्याचे आणि प्रसिद्धी माध्यमांशी याबाबत न बोलण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत.

१२ दिवसांपासून राणा पती-पत्नी कारागृहात होते. ‘मातोश्री’समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दिले होते. पोलिसांनी त्याबाबत कलम १२४ (अ) नुसार राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर विधाने करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणे आदी आरोपांचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. आज विशेष न्या. राहुल रोकडे यांनी राणा पती-पत्नीला सशर्त जामीन मंजूर केला. अशा प्रकारचे वर्तन पुन्हा करू नये, या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलू नये आदी कठोर अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. राणा यांनी जामीन अर्जात त्यांच्या लहान मुलीचा उल्लेख केला होता. त्यामुळे जामीन मंजूर झाल्यावर ते पुन्हा अमरावतीला परत जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलिसांनी एफआयआर दाखल करताना नियमानुसार कारवाई करण्याची आवश्यकता होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

अटींचा भंग झाल्यास जामीन रद्द
पोलिसांनी राणा पती-पत्नीला चौकशीसाठी २४ तास आधी नोटीस द्यावी, त्यांनी चौकशीसाठी सहकार्य करावे, माध्यमांशी या प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारे संवाद साधू नये, यातील साक्षी-पुरावे प्रभावित करू नयेत, मुंबईबाहेर जाण्याची परवानगी आदी शर्ती न्यायालयाने घातल्या असून प्रत्येकी ५० हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला आहे. अटींचा भंग राणा पती-पत्नीने केल्यास त्यांचा जामीन अर्ज रद्द केला जाईल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने दिली आहे. मुंबई पोलिसांनी ता. २३ रोजी त्यांना अटक केली होती.

अजून एक रात्र तुरुंगातच
राणा दाम्पत्याला बुधवारी जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांना रात्र कारागृहात काढावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्यामुळे त्याच कोर्टातून जामीन प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. संबंधित प्रकरण खारमध्ये घडले असून बोरिवली न्यायालयीन क्षेत्रात येते. त्यामुळे जामिनावर सोडण्याचा आदेश बोरिवली न्यायालयात पूर्ण होऊ शकतो. दुसरीकडे, न्यायालयीन आदेशांच्या अटींची पूर्तता व कागदोपत्री कार्यवाहीस विलंब झाल्याने राणा दाम्पत्याच्या सुटकेचे न्यायालयाचे आदेश तुरुंग अधिकाऱ्यांकडे पोहोचू शकले नाहीत. गुरुवारी (ता. ५) दुपारी १२ वाजेपर्यंत आदेश दोन्ही तुरुंग प्रशासनाकडे पोहोचतील. त्यानंतर दुपारी १ वाजल्यानंतर राणा दाम्पत्य तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06056 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top