
आरपीएफ जवानांसाठी मुलुंडमध्ये नवीन बॅरेक
मुंबई : मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभाग कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये रेल्वे प्रशासनाने वाढ केली आहे. मुलुंड येथे नव्याने बांधलेल्या या आरपीएफ बॅरेकमध्ये व्यायामशाळा, टेनिस कोर्ट, कपडे धुलाई मशीनची सुविधा नव्याने पुरविण्यात आली आहे; तर पेट्रोलिंग ड्युटीसाठी दाखल झालेल्या नवीन दुचाकींना प्रशासनाने आज हिरवा झेंडा दाखवला. मुलुंड येथे आयोजित कार्यक्रमात नव्याने बांधलेल्या मुलुंड आरपीएफ बॅरेक `वैथरणा''चे उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी केले. या बॅरेकमध्ये २२६ आरपीएफ कर्मचाऱ्यांची राहण्याची क्षमता आहे. येथे मनोरंजन कक्ष, व्यायामशाळा, आधुनिक स्वयंपाकघर आणि जेवणाचे हॉल यांसारख्या सुविधा आहेत.
आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी पुरेशी क्षमता सामावून घेऊ शकणारे हे नवीन बॅरेक कोणत्याही प्रसंगात उपयुक्त ठरू शकते, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. लाहोटी यांच्यावतीने आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी नवीन अधिग्रहित केलेल्या नऊ एनफिल्ड मोटारसायकलींना हिरवा झेंडा दाखवला. ज्यांचे मुंबई विभागातील विविध आरपीएफ ठाण्यांमध्ये वितरण केले जाईल. या मोटरसायकली दलाचे बळ वाढवणाऱ्या ठरतील. तसेच आरपीएफ कर्मचाऱ्यांना नियमित गस्त घालण्यासाठी वापरण्याव्यतिरिक्त कोणतीही घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचण्यास उपयुक्त ठरतील. यामुळे वे-साईड स्टेशनवर २४ तास गस्त घालणे शक्य होऊ शकेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06075 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..