जवाहर बालभवनचा कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवाहर बालभवनचा कायापालट
जवाहर बालभवनचा कायापालट

जवाहर बालभवनचा कायापालट

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई आदी नेत्यांचा वारसा असलेल्या मुंबईतील चर्नी रोड येथे असलेल्या जवाहर बालभवनाचा लवकरच कायापालट होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज जवाहर बाल भवन या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ झाला. या वेळी समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक, कैलास पगारे, मुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे, बालभवनचे संचालक आर. एस. नाईकवाडी आदी उपस्थित होते.
जवाहर बाल भवन या इमारतीच्या नूतनीकरणात विविध कामांचा समावेश आहे. बालभवनमध्ये चार ते १६ वयोगटातील मुलांसाठी संगीत, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, तबला अशा विविध छंदवर्गाचे आयोजन अत्यंत माफक शुल्कामध्ये वर्षभर करण्यात येते. या बालभवनच्या इमारतीस ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ही इमारत जीर्ण झाल्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यानुसार सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करून तिला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे वर्षा गायकवाड या वेळी म्हणाल्या. तसेच या वास्तूचे अशाप्रकारे नूतनीकरण झाल्यानंतर ती तात्काळ लक्षात यावी आणि ती नजरेत भरावी यासाठी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून आपापल्या संकल्पना मांडाव्यात. त्यानुसार पुढील कार्यवाहीची रूपरेषा आखून सुंदर वास्तू निर्माण करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विविध सुविधा मिळणार
जवाहर बालभवनच्या पहिल्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम तयार केले जाणार आहे; तर दुसऱ्या मजल्यावर विविध छंदवर्गांकरिता स्वतंत्र कला दालने निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या भवनाला एक नवे रूप मिळणार असून त्यासाठी कामाचा आराखडा तयार करण्याचे काम सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील आर्किटेक्चर विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

...अशी आहे पार्श्वभूमी
बालभवन ही इमारत मरिन लाईन्स या ठिकाणी समुद्राच्या काठावर दिमाखात उभी आहे. या इमारतीचा कोनशिला २४ मे १९५० ला भारताचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शुभ हस्ते बसवण्यात आली. त्यानंतर २४ फेब्रुवारी १९५२ ला बालभवनचे उद्‌घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पार पडले. तसेच ६ डिसेंबर १९५२ ला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांनी बालभवनला भेट दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06076 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top