म्हाडातर्फे उमेदवारांना शुल्क परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHADA should refund the fee to the candidates
परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना शुल्क परतावा

म्हाडातर्फे उमेदवारांना शुल्क परतावा

मुंबई : म्हाडा भरती परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या संचालकाने पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली होती. उमेदवारांना झालेल्या त्रासामुळे त्यांना परीक्षा शुल्क परत देण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले होते. त्याप्रमाणे केवळ १२ डिसेंबर रोजी परीक्षा असलेल्या उमेदवारांनाच शुल्क परत देण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध १४ संवर्गांतील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी ‘जीएस सॉफ्टवेअर’ कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी १२, १५, १९ आणि २० डिसेंबर रोजी दोन सत्रांत परीक्षा आयोजित केली गेली होती. १२ डिसेंबर रोजी झालेल्या दोन्ही सत्रांतील परीक्षेला एक लाख दोन हजार ४०० उमेदवार बसणार होते. वेळापत्रकानुसार ते परीक्षा केंद्रांवर पोहचले; परंतु पेपर फोडण्याचे प्रकरण समोर येताच म्हाडाने परीक्षा रद्द केली.

जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जाहीर केला होता; मात्र म्हाडा प्राधिकरणाने पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचेच शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला गृहनिर्माण विभागाने मंजुरी दिल्याने म्हाडाने १२ डिसेंबर २०२१ रोजीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच शुल्काचा परतावा देण्यास सुरुवात केली आहे.

पैसे जमा झाल्याची खातरजमा करा!
उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेल्या बँक खात्यावरच पैसे जमा केले जाणार आहेत. उमेदवारांनी त्या खात्यात पैसे जमा झाल्याबाबत खातरजमा करावी, असे आवाहन म्हाडा प्राधिकरणाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06077 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top