
एसटीचे वातावरण गढूळ करणाऱ्यांना सोडणार नाही! एसटीचे वातावरण गढूळ करणाऱ्यांना सोडणार नाही!
प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : न्यायालयाच्या आदेशानंतर संपकरी कर्मचारी एसटीच्या सेवेत हजर झाले; परंतु त्यांच्यात गट-तट पडले आहेत. प्रस्थापित एसटी संघटना आणि संपात आघाडीवर असलेल्या त्यांच्या नेत्यांच्या समर्थकांकडून आगार पातळीवर कर्मचाऱ्यांना भडकावून पुन्हा संप पुकारण्याची फूस लावली जात असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीतील वातावरण गढूळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.
एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बुधवारी विभाग नियंत्रकांची बैठक घेऊन एसटी सेवा प्रभावीपणे सोडण्याच्या सूचना दिल्या. तोट्यात असलेली एसटी सेवा पुन्हा प्रवाहात कशी आणता येईल, यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शिवाय ईटीआयएम मशीनमुळे वाहकांना उद्भवणाऱ्या समस्यांवरही तोडगा काढण्यासंदर्भात सर्व विभाग नियंत्रकांनी आपले मत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा चन्ने यांचा प्रयत्न आहे. मात्र, दुसरीकडे रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्याबद्दल अजूनही सकारात्मकता नसल्याचे दिसून येत आहे. अनेक कर्मचारी अजूनही संपाची भाषा करताना दिसत आहेत. काही जणांनी अजूनही आपण सदाभाऊ खोत, ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संपर्कात असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या वेळी अशा कर्मचाऱ्यांना सोडायचे नाही, असा ठाम विचार परिवहन मंत्र्यांनी केला आहे.
आज एसटी मुख्यालयात महत्त्वाची बैठक
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एसटी मुख्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. विभाग नियंत्रकांची ही पहिलीच बैठक असणार आहे. परिवहन मंत्री विभाग पातळीवरील आढावा घेणार आहेत. बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी विभाग नियंत्रकांची तातडीने बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सर्व माहिती घेऊन चर्चा होईल. महामंडळातील अंतर्गत वातावरण गढूळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
- ॲड. अनिल परब, परिवहन मंत्री.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06082 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..