राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे गैर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे गैर
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे गैर

राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे गैर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांनी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आंदोलन मागे घेतले होते; मात्र मुख्यमंत्र्यांबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत; तरीही त्यासाठी राजद्रोहाचा भादंवि १२४ (अ) चा आरोप प्रथमदर्शनी लागू शकत नाही, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले. राजकीय नेत्यांनी जबाबदारीने विधाने करावी, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.

राज्य सरकारने एकूणच सर्व प्रकारावरून राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये भादंवि कलम १२४ (अ) चा गुन्हा नोंदविला गेला आहे; मात्र सत्र न्या. राहुल रोकडे यांनी याबाबत पोलिसांना आणि सरकारला फटकारले. जर आंदोलन मागे घेतले होते, हिंसाचार झाला नाही, तर मग राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे गैर आहे, असे न्यायालयाने सांगितले. राणा पती-पत्नीची मुख्यमंत्र्यांसंबंधित विधाने आक्षेपार्ह आणि दोषारोप ठेवणारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या सीमारेषा ओलांडल्या; मात्र राजद्रोहाचा आरोप ठेवण्यासाठी एवढी कारणे पुरेशी नाहीत, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. राजकीय व्यक्तींनी सामाजिक शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते, असा शेरा न्यायालयाने राणा दाम्पत्याला लगावला.

राणा दाम्पत्याच्या जामिनाचे सतरा पानी निकालपत्र शुक्रवारी उपलब्ध झाले आहे. राणा यांची विधाने हिंसाचार निर्माण करणारी, लोकांना चिथावणी देणारी किंवा राज्य सरकारला कोणत्याही प्रकारे झटका देणारी आढळत नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी १२४ (अ) ची पूर्तता करणारा राजद्रोहाचा आरोप या प्रकरणात आढळत नाही, असे विशेष न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. मात्र, प्रसिद्धिमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत संपूर्णतः आक्षेपार्ह विधाने केली आहेत, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली आहे.

माध्यमांशी संवाद साधू नये!
राणा पती-पत्नीं केलेली विधाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सीमांचे उल्लंघन करणारी आणि राज्यघटनेच्या अधिकार क्षेत्राचा भंग करणारी निश्चितच आहेत. मात्र त्यासाठी राजद्रोहाचा आरोप लागू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. राणा यांनी कोणाला हत्यारांसह हल्ला करण्यासाठी चिथावले नाही आणि त्यांच्या विधानाने हिंसाचार झाला नाही, असेही न्यायालयाने म्हटले. अशा परिस्थितीत कठोर अटी लादून जामीन मंजूर करणे योग्य आहे, त्यामुळे त्यांनी माध्यमांशी या प्रकरणाबाबत बोलू नये असे आदेश देत जामीन मंजूर करत आहे, असे निकालपत्रात नमूद केले आहे. राणा यांना नोटीस देऊनही वारंवार ते चिथावणीखोर विधाने करत होते, त्यासाठी अमरावतीमधून ते मुंबईत दाखल झाले आणि सामाजिक तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणली. याशिवाय सरकार व मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते, असा युक्तिवाद पोलिसांनी केला होता. राणा दाम्पत्य बारा दिवस कारागृहात होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06096 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top